साकुरी- शिर्डीला लागून असलेल्या राहाता तालुक्यातील निघोज या गावाची ओळख आता केवळ शेतीप्रधान गाव म्हणून मर्यादित राहिलेली नाही. २०११ साली सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव आता १५ वर्षांतच साडेपाच हजारांच्या घरात पोहोचले आहे. शिर्डीच्या वाढत्या पर्यटनामुळे, गगनचुंबी इमारती, हॉटेल्स, गृहप्रकल्प व ग्रामपंचायतमार्फत झालेल्या पायाभूत सुविधा यामुळे हे गाव शहरी स्वरूपाकडे झपाट्याने वाटचाल करत आहे.
निघोज हे गाव २० वर्षांपूर्वी अन्य गावांप्रमाणे पारंपरिक शेतीवर आधारित होते. येथे फुलशेती व बागायती शेती प्रसिद्ध होती. रेल्वे प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी आपली जमीन उदार अंतःकरणाने दिली, त्याबदल्यात त्यांना भरघोस मोबदला मिळाला. त्यामुळे आर्थिक चक्र गतीमान झाले.

साईबाबा संस्थानमार्फत सुरु झालेल्या विविध प्रकल्पांमुळे, तसेच रेल्वे व इतर विकास कामांमुळे व्यवसाय क्षेत्रास चालना मिळाली. आज या गावात उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती, हॉटेल्स व गृहप्रकल्प ही याचीच साक्ष देतात.
भूमिपुत्रांचे भूमिपुत्राच योगदान
निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा नवनाथ मोरे म्हणाल्या की, “दोन-तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावाने आता साडेपाच हजारांचा टप्पा पार केला आहे. रेल्वे प्रकल्पासाठी भूमिपुत्रांनी दिलेल्या जमिनीमुळे मोठे प्रकल्प उभे राहिले. गावाच्या विकासाची हीच गती भविष्यात आणखी वेग घेणार आहे.”
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले
उपसरपंच बाळासाहेब सिताराम मते यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ते, पाणी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढल्याने निघोजची वाटचाल शहरीकरणाकडे होत आहे.”