अकोले- भारतात सापांच्या तीन हजारांहून अधिक जाती आढळतात, त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे २६५ जाती आहेत. यामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच विषारी सापांची संख्या असून उर्वरित साप बिनविषारी आहेत. अन्न साखळी टिकवायची असेल, तर फक्त साप नव्हे, तर जंगलही वाचवणे आवश्यक आहे. साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असून, निसर्ग समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन सर्पमित्र धनंजय मोहिते यांनी केले.
श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत रविवारची शाळा या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. मोहिते बोलत होते. या वेळी श्री समर्थ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास रेणुकदास, पत्रकार प्रदीप कदम, ट्रस्टचे कार्यालयीन प्रमुख आकाश भालेराव, प्राणीमित्र चैतन्य कदम, विवेक देठे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहिते म्हणाले की, जंगल वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी झाडे लावा आणि निसर्गाशी नातं जोपासा. त्यामुळे सापांचे संरक्षण होईल. बिनविषारी सापांना मारू नका, कारण ते कोणताही धोका निर्माण करत नाहीत. साप झाडांवरील किडींपासून ते शेतातील उंदरांपर्यंत
अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. उंदरांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साप अत्यंत उपयुक्त ठरतात.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या सापांपैकी फक्त पाच सापच विषारी आहेत. सापाच्या जिभेमुळे विषबाधा होत नाही, तर त्यांच्या तोंडातील दोन विषदांतांमुळे विषबाधा होते. त्यांच्याकडे विषाची पिशवी असते. सापाला हात, पाय किंवा कान नसतात. त्याला आवाज ऐकू येत नाही आणि त्याची दृष्टीसुद्धा फार लांबची नसते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे विषारी आणि बिनविषारी सापांबाबत योग्य माहिती मिळवूनच वर्तन करणे आवश्यक आहे. फक्त भीतीच्या आधारे सापांना मारू नका, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले.