राहुरी- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सध्या पटसंख्या टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. परिणामी, जि.प. शाळांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांना पालकांचा वाढता कल, सेमी इंग्रजीसारख्या उपायांची मर्यादा, तसेच शासनाच्या विविध प्रयत्नांनंतरही जि.प. शाळांचा पटसंख्या घटत आहे.
तालुक्यात सध्या एकूण २४७ जि.प. प्राथमिक शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा २७ असून नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांची संख्या १३ आहे. खाजगी प्राथमिक शाळा ९ आणि आश्रमशाळा ४ असून, तालुक्यातील शाळांची एकूण संख्या २९७ आहे. जि.प. शाळांमध्ये ७२९ शिक्षक कार्यरत असून, या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत एकूण विद्यार्थी संख्या १२५६८ इतकी आहे.

ही संख्या दोन वर्षांपूर्वी १६५९४ होती. दुसरीकडे, इंग्रजी माध्यमाच्या २७शाळांमध्ये सध्या ९२९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या दोन वर्षांपूर्वी ८९३४ होती. नगरपालिका शाळांमध्ये १२४२ विद्यार्थी असून आश्रमशाळांमध्ये ९५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पटसंख्या टिकवण्यासाठी पूर्वी महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र, वस्ती शाळा, साखर शाळा, संधी शाळा अशा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु शालाबाह्य मुलांची संख्या फारशी कमी झाली नाही.
सध्या जि.प. शाळांमध्ये ‘मिशन आरंभ’ या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तासिका घेतल्या जात आहेत. याचा फायदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी होतो. डिजीटल बोर्ड, संगणक, एलसीडी प्रोजेक्टर, मोफत पुस्तके, गणवेश, बूट सॉक्स, वृक्षारोपण, किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा, पालकांशी संवाद आदी उपक्रमही राबविले जात आहेत.
शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांशी सुसंवाद साधला जातो. मात्र, मुख्याध्यापकांना शिपाई व लिपिकाचे कामही करावे लागते. त्यातच निवडणूक, मतदार यादी, सर्वेक्षण, पोषण आहार योजना यांसारखी कामे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापासून शिक्षकांचे लक्ष विचलित करत आहेत.
कमी शिक्षक संख्या, घटता जन्मदर, वाढती अविवाहितांची संख्या, आरटीई अंतर्गत प्रवेश यांसारख्या बाबीही पटसंख्येच्या घटास कारणीभूत ठरत आहेत. जर लवकर उपाययोजना अमलात आणल्या नाहीत, तर जि.प. शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
“गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मिशन आरंभ उपक्रम सुरू आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित ९.३० ते १०.३० या वेळेत अतिरिक्त तासिका घेतल्या जातात. शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने सराव चाचण्या केल्या जातात. पालकांचे समुपदेशन करण्यासाठी केंद्रस्तरीय बैठका घेण्यात येणार आहेत.”
– मोहनीराज तुंबारे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, राहुरी
“शिक्षकांना अध्यापनाशिवाय निवडणूक, सर्वेक्षण, मतदार यादी, पोषण आहार योजना यासारखी अनावश्यक कामे केली जातात. त्यामुळे शिकवण्यावर परिणाम होतो. गुणवत्तावाढीसाठी मिशन आरंभसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जाणे आवश्यक आहे.