अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असेलला आरोपी पोलिसांना चकवा देत झाला फरार, दोन पोलिस निलंबित

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी सुनील लोखंडे जिल्हा रुग्णालयातून पलायन करण्यात यशस्वी झाला. देखरेख करणाऱ्या दोघा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली असून शोध सुरु आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयातून खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सुनील लक्ष्मण लोखंडे (वय ५२, रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी, १० जून २०२५ रोजी घडली. या घटनेमुळे स्थानिक पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोखंडे याच्यावर यापूर्वी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप आहे. या पलायनाच्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

उपचारासाठी रुग्णालयात केले होते दाखल

सुनील लक्ष्मण लोखंडे हा मूळचा पुणे येथील रहिवासी असून, तो पुणे पोलिस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे. त्याच्यावर राहुरी तालुक्यातील एका अत्याचाराच्या घटनेतील पीडित महिला आणि तिच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याचा तसेच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप आहे. या गुन्ह्यांमुळे त्याला अटक करण्यात आली होती आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. मूत्राशयाच्या आजारामुळे त्याला २ जून २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयात त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिस मुख्यालयातील पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश यशवंत दायजे यांची नेमणूक करण्यात आली होती.

पोलिसांना दिला चकवा

मंगळवारी सकाळी ९ वाजता पोलिस हेड कॉन्स्टेबल संजू किसन वाघमारे यांनी रुग्णालयात हजर होऊन लोखंडे यांच्या वॉर्डबाहेर पहारा देण्याचे काम सुरू केले. दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास लोखंडे बाथरूमसाठी गेला, तेव्हा त्याने संजू वाघमारे यांची नजर चुकवून हातातील बेड्या काढल्या आणि रुग्णालयातून पसार झाला. या घटनेनंतर वाघमारे यांनी तत्काळ आपले सहकारी योगेश दायजे यांना माहिती दिली. दोघांनी मिळून रुग्णालय परिसरात लोखंडे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून आरोपीच्या पलायनाची माहिती दिली. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली.

पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

लोखंडे याच्या पलायनामुळे पोलिसांच्या बंदोबस्तातील गंभीर त्रुटी समोर आल्या. या प्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस हेड कॉन्स्टेबल संजू किसन वाघमारे आणि योगेश यशवंत दायजे या दोघांना मंगळवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. त्यांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ जारी करण्यात आले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

गुन्ह्याची नोंद आणि शोधकार्य

लोखंडे याच्या पलायनानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून, त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. लोखंडे याने यापूर्वीही गंभीर गुन्हे केल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या पलायनामुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस यंत्रणा आता तांत्रिक माहिती आणि इतर साधनांचा वापर करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe