अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात सध्या पन्नास टक्क्याहून (१५ टीएमसी) अधिक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अवघा १६ टक्के पाणीसाठा प्रकल्पात होता.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास यंदा लवकरच कुकडी प्रकल्पातील धरणं ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. यंदा अगदी मे महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले आहे, मात्र कुकडी पाणलोट क्षेत्रात जून महिन्यानंतरच पाऊस सुरू झाला. त्यानंतर अधून मधून पाऊस सुरू राहिल्याने कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढतच राहिला.

सध्या डिंभे धरणात एकूण १० हजार ३४४ दशलक्ष घनफूट पाणी आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ९ हजार ३४४ दलघफू आहे. त्यापाठोपाठ माणिकडोह धरणात ३ हजार ४९३ दलघफू एकूण पाणीसाठा असून २ हजार ७९३ उपयुक्त पाणी आहे.येडगाव धरणात १ हजार ९७८ दलघफू पाणी असून १ हजार ४७८ उपयुक्त साठा आहे. पिंपळगाव जोगे धरणात ५ हजार ६९१ दलघफू पाणी असून १ हजार २७० दलघफू उपयुक्त साठा आहे. वडज धरणात ८१० दलघफू उपयुक्त पाणी आहे.
विसापूर धरणात ९०४ दलघफू पाणी उपयुक्त आहे. घोड धरणातही ५ हजार ४५७ दलघफू पाणी असून ४ हजार ३५१ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात एकूण पाणीसाठा १६ हजार ६९६ दलघफू आहे. त्यातील उपयुक्त
पाणीसाठा १५ हजार ६९८ दलघफू आहे. गेल्या वर्षी याच वेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४ हजार ८६० दलघफू होता.
कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. मे महिन्यात झालेल्या पावसानंतर लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही. दोन दिवसांपूर्वी काही भागात जोरदार सरी बरसल्या. मात्र, शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची आवश्यकता आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, कपाशी, बाजरी अशी पिके जोमात आहेत. त्यांना दमदार पावसाची गरज आहे.
धरणे भरल्यास ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्रातील तलावात…
कुकडी प्रकल्पातील धरणे लवकर भरल्यास लाभक्षेत्रातील तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे तलाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांना फायदा होतो. गेल्या वर्षी डिंभे धरण लवकरच भरले होते. तसेच येडगाव धरणातही पाणी आवक सुरू होती. त्यामुळे जवपास दीड महिना कुकडी कालव्याला पाणी सुरू होते. त्यामुळे सीना धरण कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून भरले होते. त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना झाला होता.
माणिकडोह धरणाकडे लक्ष…
कुकडी प्रकल्पात समावेश असलेले माणिकडोह धरण बऱ्याचदा पूर्णक्षमतेने भरत नाही. त्यामुळे कुकडीत पाण्याची तूट कायम राहते. डिंभे धरण जवळपास दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. त्याचे पाणी नदी पात्रात गेल्यानंतर घोड धरणही तत्काळ भरते. तसेच याशिवाय इतरही पिंपळगाव जोगे, वडज, येडगाव धरणे भरतात. येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडले जाते. त्यातूनच श्रीगोंदा, पारनेर, कर्जत तालुक्यांना पाणी मिळते.