Ahilyanagar News: नेवासा- पुणे येथून जळगावकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भिषण अपघात होऊन त्यात बोदवड (जि. जळगाव) येथील खाजगी क्रिकेट प्रशिक्षण संस्थेतील दोन विद्यार्थी ठार झाले. तर इतर ११ जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात काल सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
याप्रकरणी क्रिकेट प्रशिक्षक गौरव सुनील भोई (रा. बोदवड, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात क्रुझर चालक अविनाश उर्फ रोशन गोकुळसिंग निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या अपघातातील जखमी प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. बोदवड, जि. जळगाव) व वृषभ बबन सोनवणे (वय १६) हे दोघेही उपचारादरम्यान मयत झाले आहेत.

क्रिकेट पाहण्यासाठी गेले होते पुण्याला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व प्रशिक्षक भुषण भोई, अक्षय माळी हे बोदवड (जि. जळगाव) येथे खाजगी क्रिकेट प्रशिक्षण देणारी ॲकेडमी चालवतात. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास फिर्यादी हे प्रशिक्षक उज्ज्वल उर्फ भुषण भोई, अक्षय माळी, विद्यार्थी चिन्मय भोई, कुश घाटे, प्रद्युम्न कुलकर्णी, आरव शेळके, प्रतिक धुमक, हर्षल महाजन, आगम खिवसरा, वंश अग्रवाल, रोहन बेगाने, साई जाट, उदय कोल्हे, प्रथमेश तेली, वृषभ सोनवणे (सर्व रा. बोदवड, जि. जळगाव), असे रोशन गोकुलसिंग निकम याच्या (एम.एच. २० डि.जे. ४८३४) क्रमांकाच्या भाडोत्री क्रुझर गाडीमध्ये बसून महाराष्ट्र प्रिमीयर लीगच्या मॅचेस पाहण्यासाठी गंहुजे (जि. पुणे) येथे गेले होते.
क्रुझरने दिली ट्रकला जोराची धडक
मॅच संपल्यानंतर काल सोमवारी रात्री साडेबारा वाजता गावी जाण्यासाठी माघारी निघाले असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास उस्थळ दुमाला शिवारातील अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुढे वाहनांची गर्दी होती. गाडीतील चालकाने त्याच्या ताब्यातील क्रुझर गाडी भरधाव वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करून ट्रॉफिकमध्ये उभ्या असलेल्या एम. एच. ११ ए.एल. ५११७ क्रमांकाच्या ट्रकला जोराची धडक दिली. त्यामुळे अपघात होवून अपघातात क्रुझर गाडीचे मोठे नुकसान झाले.
आमदार लंघेनी केली जखमींची विचारपूस
गाडीतील सर्वांना कमी-अधिक दुखापत झाली. स्थानिकांनी खाजगी ॲम्बुलन्स बोलावून उपचाराकरिता नेवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोनि. धनंजय जाधव पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेमधून नेवासा फाटा येथे उपचारसाठी दाखल केले होते. आ. विठ्ठलराव लंघे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.