Agricultural News : सध्या अनेक शेतीमालाचे भाव रिटर्न येताना दिसत आहे. कांदा, कापूस हे नगदी पिके. परंतु नुकतेच कांद्याचे भाव अत्यंत कोसळले. आता त्या पाठोपाठ पांढरे सोने म्हणून ओळख असणारे कापसाचे भाव देखील कोसळले आहेत.
यातच व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होतोय. त्यामुळे कापूसउत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकरी अहोरात्र कष्ट करून कपाशीचे पीक जगवितात व
ज्या वेळेस कापूस विकायला सुरुवात होते त्याच वेळेस भाव कोसळतात असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव शेतकऱ्यांना येतोय.
व्यापारी देतात विविध कारणे
व्यापारी कापूस खरेदी करताना विविध कारणे शेतकऱ्यांना देत भाव कमी करतो. शेतकऱ्याकडचा कापूस ओला असणे, कापूस काळा-पिवळा पडणे, कापूस गरम असणे आदी कारणे शेतकऱ्याला दिली जातात.
त्यातून कापसाची कवडीमोल दराने खरेदी व्यापारी करतो. मागील वर्षीही सुरवातीला कापसाची हाल झाली. परंतु नंतर ९००० ते ९५०० क्विंटलपर्यंत दर मिळाला. असाच काही भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली.
पावसाचा फटका बसूनही उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. परंतु, कापसाचे बाजार भाव कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
किती मिळतोय कापसाला भाव?
ऑक्टोबर महिन्यात कपाशी खरेदीला सुरुवात झाली. त्यावेळी ७३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. आता सध्या भाव कमी झाले असून ६००० ते ६८०० रुपये क्विंटलवर भाव आला आहे. मागील दोन महिन्यांत कापसाचा दर ५०० रुपयांनी घसरले आहेत.
सद्यस्थती पाहता खते, बियाणे महाग झाली आहेत. त्या तुलनेत भाव मिळत नाही. पावसाने अगोदरच बऱ्याच शेतपिकांचे नुकसान केले आहे. त्यात आता कापसाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.