महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मूग, उडीद आणि तूर या प्रमुख कडधान्यवर्गीय पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यापैकी तूर हे प्रमुख पिक असून तुरदाळ ही स्वयंपाक घरातील आवश्यक घटक असल्यामुळे तुरीला बाजारपेठेत चांगला बाजार भाव असतो. तूर या पिकाची मुख्य पीक आणि आंतरपीक म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
या महत्त्वाच्या असलेल्या पिकाच्या बाजारभावाबाबत सध्या विचार केला तर इतर कडधान्य वर्गीय पिके जसे की मूग, उडीद आणि सोयाबीन सारख्या पिकाला आणि कापसाला देखील मागे टाकत बाजारभावात तुरीने वेग पकडलेला दिसून येत आहे.
तुरीला मिळत आहे इतका बाजारभाव
सध्या जर तुरीच्या बाजारभावाचा विचार केला तर तो साडेनऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका असून या खरीप हंगामामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे तुरीच्या बाजारभावामध्ये येणाऱ्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबतीत जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीचा विचार केला तर या जिल्ह्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये तुरीला सरासरी क्विंटलला नऊ ते साडेनऊ हजार रुपये बाजार भाव मिळताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक बाजार भाव हा नगर बाजार समितीत मिळाला असून सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटलच्या पुढेच दर मिळताना दिसून येत आहे.तसेच तुरीच्या आवकेचा विचार केला तर ती साधारणपणे 45 क्विंटल च्या आसपास होत आहे.
भविष्यात तुरीचे भाव वाढण्याची शक्यता
मागच्या खरीप हंगामाचात राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती व त्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट आलेली होती.दुसरी महत्वाची बाब म्हणजे यावर्षी देखील खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे. परंतु जून महिना संपत आला तरी देखील पावसाने हुलकावणी दिल्यामुळे किती प्रमाणामध्ये तुरीची लागवड होईल हे देखील सांगणे सध्या कठीण आहे.
जरी या खरीप हंगामामध्ये तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली तरी ही तूर बाजारात यायला आणखी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यातील कोणत्या बाजार समिती तुरीला किती मिळाला बाजारभाव?
नगर जिल्ह्यातील बाजार समितीचा विचार केला तर या ठिकाणी अहमदनगर बाजार समितीमध्ये तुरीला नऊ हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल इतका बाजार भाव मिळाला.कर्जत बाजार समिती नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल, शेवगाव बाजार समिती नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल, पाथर्डी बाजार समिती दहा हजार रुपये प्रति क्विंटल, श्रीगोंदा बाजार समिती नऊ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल आणि पारनेर बाजार समिती 9400 रुपये प्रति क्विंटल इतका बाजार भाव तुरीला मिळताना दिसून येत आहे.