राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने नवीन वर्ग संरचना जाहीर केली आहे. त्यानुसार आता शासनाच्या शाळेतच म्हणजे प्राथमिक शाळेतच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे शिक्षण मिळणार आहे. म्हणजेच यापूर्वी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीला माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यावे लागत होते, परंतु आता तसे होणार नाही.
नेमका काय आहे निर्णय?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता नवीन वर्ग संरचनेचा जाहीर करण्यात आली. त्यानुसार चौथीच्या वर्गाला पाचवीचे वर्ग आणि सातवीच्या वर्गाला आठवीचे वर्ग जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही नवी संरचना पहिली ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक व नववी ते दहावी माध्यमिक अशी यापुढे असणार आहे.

कसे होणार समायोजन?
शासनाने पाचवीचे वर्ग माध्यमिक शाळांमधून हटवून प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण घरापासून एक किलोमीटर अंतरावरच्या शाळेत मिळणार आहे. या निर्णयानुसार जे विद्यार्थी सध्या पाचवीच्या वर्गात माध्यमिक शाळेत शिकतात, त्यांना त्यांच्या जवळच्या व आवडत्या अनुदानित, स्थानिक किंवा नागरी संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये जाता येणार आहे.
का घेतलाय निर्णय?
सध्या राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सुमारे १९.२८ लाख विद्यार्थी आठवीत शिक्षण घेत आहेत. त्याऊलट नववीत केवळ १८.६३ लाख विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजेज ४० हजार विद्यार्थी इयत्ता नववीतून शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. माध्यमिक शाळांती फी परवडत नसल्याने विद्यार्थ्यांना नववीच्या पुढचे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.