Ahilyanagar News : अहिल्या नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील निकाल आता समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी मधून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले आहेत. खरंतर शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी ते पुन्हा निवडणूक जिंकले आहेत. दुसरीकडे कोपरगाव मधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे देखील विजयी झाले आहेत.
यावेळी काळे यांच्या विरोधात परंपरागत विरोधक कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात नव्हते यामुळे काळे यांना यंदाची निवडणूक सोपी गेली आणि ते सहज विजयी झालेत. दुसरीकडे, संगमनेर मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. अगदीच पहिल्या राऊंड पासून थोरात पिछाडीवर असल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे.
खरे तर थोरात हे संगमनेर मधून सलग आठ वेळा विजयी झाले आहेत. म्हणजेच त्यांनी या मतदारसंघाचे तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र थोरात हे पहिल्या राऊंड पासून पिछाडीवर असून अजूनही ते पिछाडीवर असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
संगमनेर मधून अमोल खताळ हे शिंदे गटाकडून उभे असून खताळ जवळपास 11000 मतांनी आघाडीवर आहेत. यामुळे थोरात यांच्या खेम्यात भयान शांतता पसरलेली आहे. दरम्यान, आता आपण अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड, नेवासा, श्रीगोंदा, राहुरी, श्रीरामपूर या मतदारसंघात काय परिस्थिती आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
नेवासा मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे पिछाडीवर आहेत. खरे तर एक्झिट पोल मध्ये गडाख यांच्या विजयाचा अंदाज व्यक्त होत होता मात्र गडाख हे सध्या पिछाडीवर आहेत. श्रीगोंदा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते हे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.
कर्जत जामखेड बाबत बोलायचं झालं तर येथून सुरुवातीला शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी आघाडी घेतली होती मात्र नंतर राम शिंदे यांनी आघाडी घेतली. मात्र या ठिकाणी खूपच काटे की टक्कर होत असून कोणाचा विजय होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राहुरी मतदार संघाबाबत बोलायचं झालं तर येथे शिवाजी कर्डिले हे काही वेळापूर्वी आघाडीवर होते मात्र विद्यमान आमदार तनपुरे यांनी जोरदार मुसंडी मारली असून आता ते आघाडीवर आहेत.
इथे देखील काटे की टक्कर होत आहे यामुळे या ठिकाणी देखील काय निकाल लागतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून बंडखोर उमेदवार कांबळे हे आधी आघाडीवर होते मात्र नंतर काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी जवळपास 7000 मतांची आघाडी घेतली आहे.
पारनेर मतदार संघात काशिनाथ दाते हे आघाडीवर असून शरद पवार गटाच्या राणी लंके या पिछाडीवर आहेत. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून मोनिका राजळे यांना धक्का बसला आहे, या ठिकाणी सध्या स्थितीला माजी आमदार चंद्रशेखर घुले हे आघाडीवर आहेत. मात्र येथेही जबरदस्त फाईट सुरू असून येथे कोण विजयी होणार हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे राहील.