Ahilyanagar News: शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी ! ४० टन कांदा वाहून गेला पाण्यात, टरबूजाचे दर कोसळले…

Published on -

Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्यातील भोकर शिवारात यावर्षी वारंवार झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पाऊस व त्यासोबत येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी अनेकांचे पिके उध्वस्त केली. नुकताच एक शेतकरी नानासाहेब रामदास जगदाळे यांचे चार एकर क्षेत्रातील कांद्याचे उत्पादन पूर्णतः भिजले. अंदाजे ४० टन कांद्याचे नुकसान झाल्याने त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.

जगदाळे यांनी उशिरा काढणीला आलेला कांदा घरासमोर व शेतातील झाडाखाली प्लास्टिक कागदाने झाकून ठेवला होता. मात्र, मध्यरात्री आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे प्लास्टिक उडाले आणि त्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण कांदा भिजला. पाणी आतून आणि पाऊस वरून – अशा दुहेरी फटक्याने कांद्याचा साठा अक्षरशः कुजण्याच्या मार्गावर आहे.

या शेतकऱ्याने भविष्यातील पिकांचे नियोजन, उत्पन्नाची अपेक्षा आणि कर्जाची परतफेड अशा अनेक गोष्टींचा विचार करून मेहनत घेतली होती. मात्र अवकाळी पावसाने हे सारे स्वप्न उद्ध्वस्त केले. या अपघातानंतर त्यांचे फक्त कांदा नव्हे, तर तीन एकरांत घेतलेले टरबूजही संकटात आले आहे.

ढगाळ हवामानामुळे उन्हाची तीव्रता घटल्याने टरबूज आणि खरबूजासारख्या पिकांची बाजारातील मागणी कमी झाली. परिणामी दर कोसळले आणि व्यापारी देखील मागे फिरले. यामुळे अनेक टरबूज बाजारात विक्री न होता गाई-गुरांसाठीच वापरावे लागत आहेत. जगदाळे यांच्यासारख्या शेतकऱ्यांसमोर आता सर्वात मोठा प्रश्न उभा आहे – “कर्जाची परतफेड कशी करायची?”

अवकाळीने फक्त पिके नाही, तर शेतकऱ्यांचे आत्मविश्वासही वाहून नेले. कांद्यावरून पाणी ओघळत होते, वरून पाऊस पडत होता आणि जमिनीवर कुजलेला कांदा पाहत जगदाळे कुटुंब हताशपणे केवळ नजरेने हे नुकसान मोजत होते. शासनाने या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची गंभीर दखल घ्यावी, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News