Agriculture News : दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. लिलाव बंद असल्याने चाळीत कांदा असूनही तो विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अशा परिस्थितीत लासलगावच्या विंचूर उपबाजार आवारात लिलाव सुरू झाल्याने शनिवारी माल विक्रीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे कांदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. समितीत दिवसभरात सुमारे २४ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक होऊन सरासरी २१५०, कमाल २५००, तर किमान ११०० रुपये दर मिळाला.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा पवित्रा घेतल्याने १० दिवसांपासून कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील केवळ विंचूर उपबाजारातच तीन दिवसांपासून लिलाव सुरू आहेत. एकमेव ठिकाणी लिलाव सुरू असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन येत असून, शनिवारी येथे विक्रमी आवक झाल्याचे दिसून आले.
लिलाव बंद असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नवीन व्यापाऱ्यांनी सकारात्मक मानसिकता दाखवल्यामुळे उपबाजार समितीत लिलाव सुरू झाले आहेत. त्यास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.