Farming Business Idea :-.परंपरागत शेती पद्धती आणि परंपरागत पिके आता काळाच्या ओघात मागे पडले असून शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून शेती व्यवसाय खूप फायद्याचा करताना दिसून येत आहेत.
तसेच आपण जर आजच्या सुशिक्षित तरुणांचा विचार केला तर नोकरींची उपलब्धता फार कमी असल्यामुळे बरेच जण आता शेतीकडे वळत आहेत. परंतु असे सुशिक्षित तरुण त्यांच्यासोबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा ओघ देखील मोठ्या प्रमाणावर आणत असून अगदी वेगळ्या पद्धतीने शेती करत आहेत.

यामध्ये वेगळ्या फळबागांची लागवड हे तरुणांची प्रथम पसंती असताना दिसून येत आहे. अनेक प्रकारचा अभ्यास करून उत्तर भारतात पिकणारे सफरचंद देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. यासोबतच अनेक जोडधंद्यांमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने खूप मोठी प्रगती शेतकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आता तंत्रज्ञानाच्या वापराने शेती आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर करत आहेत. याच अनुषंगाने जर आपण केशर पिकाचा विचार केला तर हे सोन्या-चांदीच्या भावामध्ये विकले जाणारे पीक आहे.
साधारणपणे याची लागवड किंवा याचे उत्पादन भारतातील जम्मू-काश्मीर या ठिकाणी घेतले जाते. परंतु आता भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी देखील केशरची लागवड करताना दिसून येत आहे. अगदी प्रायोगिक तत्वावर का असेना परंतु महाराष्ट्रामध्ये देखील केशरची लागवड शेतकऱ्यांनी यशस्वी केली आहे.
जर केशरची आपण बाजारपेठेतील किंमत पाहिली तर जवळपास एका किलोला तीन लाख रुपये इतके असते. त्यामुळे तुम्ही एक किलो जरी उत्पादन घेतले तरी तीन लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. या केशर लागवडीच्या अनुषंगाने आपण बिहार राज्यातील एका शेतकऱ्याची यशोगाथा बघणार आहोत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बिहार राज्यात असलेल्या गया या जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आशिष कुमार सिंह यांनी शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करावा असे मनामध्ये निश्चित केले व या दृष्टिकोनातून चाचपणी करत असताना त्यांनी केशर शेती करण्याचा निर्णय घेतला.
याकरिता त्यांनी तीन किलो बियाण्याची लागवड केली. केशर लागवड केल्यानंतर जवळपास तीन ते चार महिन्यांच्या आसपास या पिकाचा कालावधी असतो. पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता आशिष कुमार हे कायमच वेगवेगळे उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात.
या अगोदर देखील त्यांनी काळे गहू तसेच निळे गहू, काळे बटाटे व काळी हळद पासून तर लाल तांदूळ व हिरवे तांदूळ इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे देखील यशस्वीपणे उत्पादन घेतलेले आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी या सर्व नवीन पिकांचे प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये यशस्वी करून दाखवले आहेत.
परंतु याही पेक्षा वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी केशर शेतीतून स्वतःचे नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. इतर शेतकऱ्यांना यशस्वीरित्या केशरची शेती करताना पाहून त्यांना ही कल्पना सुचली व त्याकरिता त्यांनी श्रीनगर वरून बियाणे मागवली व याकरिता पंधराशे रुपये प्रतिकिलो त्यांना खर्च आला.
केशर ची लागवड केल्यानंतर ते यशस्वी व्हावे याकरिता त्यांनी काश्मीरच्या शेतकऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. त्याचेच फळ त्यांना आता मिळायला लागले असून जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात यामधून केशरचे फुल उमलायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे.
केशर शेती करिता दहा डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते व त्यामुळेच डिसेंबर ते जानेवारी हा काळ केशर उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. विशेष म्हणजे केशरची पुन्हा पुन्हा तुम्हाला लागवड किंवा पेरणी करायची आवश्यकता भासत नाही.
एकदा का तुम्ही लागवड केली तर अनेक वर्ष या बियाण्यालाच फुलं येत राहतात. जर तुम्ही लागवड केलेली बियाणे जर जमिनीतून बाहेर काढले तर त्या बियाण्याला देखील दुसरे बियाणे आलेले असते. केशर शेतीमध्ये एकदा फुल आले की ते तोडले जातात व त्यातून धाग्यांसारखे पातळ पुंकेसर बाहेर काढले जातात.
या पुंकेसर मधून चांगले व दर्जेदार पुंकेसरांची निवड करून ते सुकवले जातात. या फुलांचा रंग फिकट जांभळा असतो व पुंकेसर लाल आणि केशरी रंगाचे असतात. अशाप्रकारे केशरचे उत्पादन घेतले जाते. एक किलो जरी उत्पादन मिळाले तरी तीन लाख रुपयापर्यंत याला बाजारपेठेत दर मिळतो.