शेतकऱ्यांसाठी खुशखबर! हवामानाचा अचूक अंदाज, खते व पीकांचा सल्ला आता मोबाईलवर मिळणार

मेघदूत, आयएमडी आणि स्कायमेट ॲप्समुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळू लागली आहे. या ॲप्समुळे पेरणी, फवारणी, कापणी यांसारख्या शेतीच्या निर्णयांमध्ये अचूकता येत असून शेती अधिक शास्त्रीय होत आहे.

Published on -

शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे, आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेकदा नुकसानीला सामोरे जावे लागते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यानुसार कृषी सल्ला मोबाइल ॲप्सद्वारे उपलब्ध होत आहे. ‘मेघदूत’, ‘आयएमडी’ आणि ‘स्कायमेट’ ही ॲप्स शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, यामुळे पेरणी, फवारणी, कापणी आणि साठवणी यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी योग्य माहिती मिळत आहे. या ॲप्सच्या माध्यमातून तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग यासारख्या हवामानाच्या माहितीप्रमाणेच स्थानिक परिस्थितीवर आधारित कृषी सल्लाही मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे.

हवामान अंदाजाचे शेतीतील महत्त्व

शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर हवामानाची माहिती महत्त्वाची ठरते. पेरणीपूर्वी पावसाचा अंदाज घेणे आवश्यक आहे, कारण वेळेआधी पेरणी केल्यास पावसाअभावी बियाण्यांची उगवणक्षमता कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे, कापणीच्या वेळी कोरडे आणि स्थिर हवामान असणे गरजेचे आहे, अन्यथा अचानक पाऊस पडल्यास पिकांचे वजन, प्रत आणि विक्रीक्षमता यावर परिणाम होतो. धान्य मळणी आणि साठवणीसाठीही कोरडे हवामान आवश्यक आहे. ‘मेघदूत’, ‘आयएमडी’ आणि ‘स्कायमेट’ ही ॲप्स शेतकऱ्यांना पुढील पाच ते सात दिवसांचा हवामानाचा अचूक अंदाज देतात, ज्यामुळे शेतकरी योग्य वेळी पेरणी, फवारणी किंवा कापणीचे नियोजन करू शकतात. 

मेघदूत ॲप्स

‘मेघदूत’ हे ॲप्स भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आले आहे. हे ॲप्स विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार केले असून, यात जिल्हानिहाय पाच दिवसांचा हवामान अंदाज उपलब्ध आहे. यामध्ये तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग यासारख्या माहितीचा समावेश आहे. याशिवाय, स्थानिक हवामानानुसार कोणते पीक घ्यावे, खतांचे प्रमाण, कीडनाशक फवारणीचे वेळापत्रक आणि सिंचनाची गरज यासारखा कृषी सल्ला मिळतो. मेघदूत ॲप्स स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांना त्याचा वापर करणे सोपे जाते. या ॲप्समुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीशी सुसंगत माहिती मिळून योग्य निर्णय घेणे शक्य होते.

आयएमडी आणि स्कायमेट

भारतीय हवामान विभागाचे ‘आयएमडी’ ॲप्स देशभरातील हवामानाची माहिती प्रदान करते आणि यलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट्सद्वारे शेतकऱ्यांना सतर्क करते. हे ॲप्स विशेषतः अतिवृष्टी, गारपीट किंवा वादळी वाऱ्यांसारख्या प्रतिकूल हवामान परिस्थितीची पूर्वसूचना देते, ज्यामुळे शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करू शकतात. दुसरीकडे, ‘स्कायमेट’ हे खासगी क्षेत्रातील हवामान सेवा देणारे ॲप्स आहे, जे उपग्रह प्रतिमा आणि सखोल विश्लेषणाद्वारे अचूक हवामान अंदाज देते. स्कायमेटचे संकेतस्थळ आणि अॅप शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त आहे. यामध्ये हवामानाच्या दीर्घकालीन अंदाजासह कृषी सल्लाही मिळतो, ज्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना त्यांच्या नियोजनात मदत होते.

शेतीतील तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि कमी जोखमीची बनत आहे. तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी सांगितले की, बदलत्या हवामान परिस्थितीत अचूक हवामान माहिती असणे ही काळाची गरज आहे. मेघदूत, आयएमडी आणि स्कायमेट यासारखी ॲप्स शेतकऱ्यांना केवळ हवामानाचा अंदाजच देत नाहीत, तर त्यानुसार पीक व्यवस्थापनाचे सल्लेही देतात. उदाहरणार्थ, कीड-रोग प्रादुर्भावाची शक्यता, फवारणीचे वेळापत्रक आणि पिकांची साठवण याबाबत मार्गदर्शन मिळते. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News