Namo Shetkari Yojana : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो. तसेच, नमो शेतकरीसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 6000 रुपये मिळतात. अर्थातच राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना दरवर्षी पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत.
पीएम किसान बाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळाले आहेत. या योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा होईल अशी माहिती देखील समोर येत आहे.

दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी पात्र शेतकऱ्यांना दिला गेला होता.
28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित करताना नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता जमा केला होता. दरम्यान, आता नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हफ्ता वितरित करण्यासाठी राज्य वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. अर्थातच, आता शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तथापि, अनेकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात चौथ्या हफ्त्याचे दोन हजार रुपये कधीपर्यंत जमा होणार हा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान याच संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
खात्यात रक्कम कधी जमा होणार
नमो शेतकरीचा चौथा हप्ता राज्यातील 90 लाख 88 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. हा चौथा हप्ता वितरित करण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.
राज्याच्या वित्त विभागाने याला मान्यता दिली असून येत्या दोन दिवसांनी याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. शुक्रवारी किंवा शनिवारी या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
पाचव्या हफ्त्याबाबत नवीन अपडेट
मागे मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी वितरित करण्यात आला असल्याने चौथा आणि पाचवा हप्ता देखील एकाच वेळी वितरित होणार असा दावा होत होता. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असेही म्हटले जात होते.
मात्र या चर्चा सुरू असतानाच शिंदे सरकारने या योजनेच्या चौथ्या हप्त्याला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या वित्त विभागाने या योजनेचा फक्त चौथा हप्ता वितरित करण्यास सध्या मान्यता दिलेली आहे. यामुळे या योजनेचा पाचवा हप्ता चौथ्या हफ्त्यासोबत मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
परंतु येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि ही बाब लक्षात घेता पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये या योजनेचा पाचवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होत आहे.