अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ ! जाणून घ्या कांदा बाजारभाव अपडेट

Published on -

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती मार्केट यार्डात शनिवारी कांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते १९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कांद्याला भाव जरी चांगला मिळाला, तरी आवक मात्र घटल्याचे दिसून आले.

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केमध्ये शनिवारी १४ हजार ८४८ गावरान कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल १५०० रुपये ते १९०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्यांना ५०० ते १००० रुपये भाव मिळाला.

चार नंबरच्या गावरान कांद्यांना प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत शनिवारी कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले. दरम्यान, कांद्याला चार दिवसांच्या तुलनेत २०० रुपयांनी भाव वाढल्याचे दिसून आले.

सध्या शेतकरी खरीप पेरणीसाठी आंतर मशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. अनेक शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी पैशाची गरज असते. त्यामुळे गरीब शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत आहेत. परंतु कांद्यांना कमी भाव मिळत असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीला पसंती दिली आहे. कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतरच ते कांदा विक्रीसाठी काढणार असल्याचे दिसून येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यावर्षी २ लाख ५० हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. रब्बी हंगामातील या कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. असे असले तरी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

३१ कांदा गोण्यांना मिळाला सर्वाधिक २१०० रुपयांचा भाव

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी १४ हजार ८४८ क्विंटल कांदा गोण्यांची आवक झाली होती. परंतु यातील ३१ कांदा गोण्यांना प्रतिक्विंटल २१०० रुपये बाजारभाव मिळाला. तर १४६ कांदा गोण्यांना उच्च प्रतिचा प्रतिक्विंटल २००० रुपये भाव मिळाला. दरम्यान, कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाली असून यापुढे आवक वाढण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe