अहिल्यानगर- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत वीज आणि शेतमालाला भरघोस दर अशा आश्वासनांचा पाऊस पाडला होता. या घोषणांनी अनेक मतदार भारावले गेले. परंतु सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन विसरले गेले.
उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत पीककर्ज फेडण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर वसुली सुरू केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

महायुती सरकारकडून फसवणूक
स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी या संदर्भात आवाज उठवत सांगितले की, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करून त्यांना निवडणुकीसाठी वापरले गेले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर आता वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे. हे धोरण केवळ अन्यायकारक नाही, तर अमानवीही आहे.
जाहीरनाम्याची होळी
या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार आहे. सरकारने जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरले असून, या फसवणुकीचा निषेध करत संपूर्ण राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटणार आहेत.
शेतकरी, बेरोजगार व ज्येष्ठांची फसवणूक
महायुतीच्या जाहीरनाम्यात फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर बेरोजगारांना दरमहा १० हजार रुपये भत्ता, ज्येष्ठ नागरिकांना २१०० रुपयांचे मासिक अनुदान, तसेच कृषी निविष्टांवरील राज्यस्तरीय जीएसटी माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या पैकी कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही.
सरकारच्या विरोधात एल्गार
अनिल घनवट यांनी स्पष्ट केले की, जेव्हा सरकारने स्वतः दिलेली आश्वासनेही पाळलेली नाहीत, तेव्हा शेतकऱ्यांना धमकावण्याचा अधिकार त्यांना नाही. सरकारची ही धोरणे जनतेविरोधी असून, त्यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ही होळी केवळ संतापाचा उद्गार नसून, जनतेच्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरणार आहे.