Tractor Scheme : शासनाकडून समाजातील सर्वच घटकांसाठी सातत्याने वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली जाते. महिलांसाठी देखील सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. देशातील महिला शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत महिलांना ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जाते. खरंतर शेती मधून जर चांगले उत्पादन हवे असेल तर आधुनिक तंत्राचा वापर होणे आवश्यक आहे.

आधुनिक यंत्रांमुळे शेतीचा व्यवसाय सोपा होतो शिवाय उत्पादनात देखील दुप्पट वाढ होते. त्यामुळे आता शेती व्यवसायात ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.
ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीचा व्यवसाय सोपा तर झालाच आहे शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालीये. पण सर्वच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य नाही. ट्रॅक्टरच्या वाढलेल्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत.
कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहजासहजी ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन आता शासनाकडून अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.
SMAM ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत महिलांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही केंद्राची महत्त्वाची योजना असून या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी 50% अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत पुरुष शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळते.
अर्थात ट्रॅक्टरची किंमत साडेचार लाख रुपये असेल तर महिला शेतकऱ्यांना दोन लाख 25 हजार रुपये अनुदान मिळणार आहे व अर्धी किंमत महिलांना द्यावी लागेल. त्याचवेळी पुरुष शेतकऱ्यांना दोन लाख 70 हजार रुपये द्यावे लागतील.
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इच्छुक शेतकऱ्यांनी https://agrimachinery.nic.in किंवा https://myscheme.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.