Agricultural News : अल निनोमुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड या सहकारी साखर संस्थेने नाकारली आहे.
या वर्षीच्या हंगामात साखरेच्या देशांतर्गत उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची अपेक्षा नाही, असेही या संस्थेने म्हटले आहे. साखरेचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालतो. २०२३-२४ वर्षासाठी गाळपाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
अल निनो-म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीचा महाराष्ट्राच्या काही भागातील मान्सूनवर परिणाम झाला आहे. परंतु इतर सर्व ऊस उत्पादक राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरयाणा, बिहार, उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे,
ज्यामुळे निश्चितच उभ्या ऊस पिकासाठी वजन आणि सुक्रोजचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे. २०२३-२४ च्या हंगामात साखरेचा संभाव्य तुटवडा होण्याबाबतीत काही वर्गात मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवली जात आहे. पण वास्तविक परिस्थिती या काल्पनिक अंदाजाच्या विरुद्ध आहे, असे नाईकवरे यांनी स्पष्ट केले.
काही राज्यांमध्ये जास्त उत्पादन अपेक्षित असल्याची उदाहरणे देताना नाईकनवरे म्हणाले की, कर्नाटकातील साखरेचे निव्वळ उत्पादन ३५ लाख टनांपर्यंत घसरण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती ४५ लाख टनांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. सर्वात मोठे ऊस आणि साखर उत्पादक असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात गेल्या वर्षीच्या निव्वळ साखर उत्पादनापेक्षा १० लाख टन अधिक साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचा विचार करता, ऑगस्टमध्ये प्रदीर्घ दुष्काळानंतर मान्सून सप्टेंबरमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे, ज्यामुळे उभ्या पिकाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. ज्या भागात हवामानाच्या प्रभावामुळे गाळप करण्यायोग्य ऊस कमी होण्याची शक्यता आहे अशा भागात ऊस गाळपासाठी भारत विशिष्ट प्रमाणात कच्ची साखर आयात करू शकतो,
अशीही एक समांतर विचार प्रक्रिया सुरू आहे. हे गाळप क्षमता वाढलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये महत्त्वाचे आहे. गाळपासाठी उसासोबत कच्च्या साखरेचा वापर केल्यास कारखानदारांना आर्थिक फायदा होईलच शिवाय शुद्ध साखरेचे उत्पादनही वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
ऊस लागवडीखालील क्षेत्रात किरकोळ वाढ
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ सप्टेंबरपर्यंत ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ किरकोळ वाढून ते मागील वर्षातल्या याच कालावधीतील ५५.६५ लक्ष हेक्टरवरून ५९.९१ लाख हेक्टरवर गेले आहे. मागच्या वर्षीच्या हंगामात ३.४ कोटी टन साखरेचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. हे उत्पादन मागील विपणन वर्षांतील ३.५८ लाख टन उत्पादनापेक्षा कमी आहे.