अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहेत.
अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय.
निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने, बडतर्फीची कारवाई प्रशासनाने सुरू केलेली आहे. जिल्ह्यातील आजअखेर एकूण २९० जण निलंबित झालेले आहेत
तर ११८ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये तारकपूर आगार १५, जामखेड ७ , श्रीरामपूर ८ , कोपरगाव ९, संगमनेर १९, श्रीगोंदे ११, पारनेर ६, नेवासे १३,
पाथर्डी १८, नगर कार्यशाळा ४, श्रीरामपूर कार्यशाळा २ कर्मचाऱ्यांवर बडतर्फाची कारवाई करण्यात आलेली आहे. एसटीच्या संपामुळे अहमदनगर विभागाला सुमारे ४५ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सध्या एसटीचे एकूण ३ हजार ७४३ कर्मचारी आहेत. त्यांतील एक हजार १०८ कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. ११० कर्मचारी आठवडाभर सुट्टीवर होते. १८२ कर्मचारी रजेवर आहेत.
३४ कर्मचारी इतर आगारांत कर्तव्यावर आहेत. ८० कर्मचारी निलंबित आहेत. २२२९ कर्मचारी गैरहजर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मुंबईच्या कामगार न्यायालयाने बेकायदा ठरवला आहे.
त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे जवळपास तीन महिन्यापासून सुरू असलेल्या संपामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे तर अनेक कर्मचारी मानसिक नैराश्यात आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस पावले उचलावेत अशी मागणी एसटी कर्मचारी करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम