अहमदनगर ब्रेकींग: प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण; मंत्री गडाख यांचा …

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022  :- मुळा एज्युकेशन सोसायटीतील कर्मचारी प्रतीक बाळासाहेब काळे (वय 27 रा. तेलकुडगाव ता. नेवासा) याच्या आत्महत्या प्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

आरोपींमध्ये मंत्री गडाख यांचा समावेश नसला, तरी त्यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्यासमोर सुनावणी होऊन मंत्री गडाख यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

प्रतीक काळे याने 29 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री धनगरवाडी शिवारात (ता. नगर) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रतीक हा मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये लिपीक म्हणून कार्यरत होता. त्याच्या आत्महत्येनंतर प्रतीकची बहीण प्रतीक्षा बाळासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार मुळा एज्युकेशन सोसायटीत नोकरीला असणारे महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याणराव औटी, तसेच मुळा साखर कारखान्यात नोकरीला असणारे राऊसाहेब भीमराज शेळके व रितेश बबन टेमक अशा सातजणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, मयत प्रतीकने आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हिडिओ व ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल केल्या होत्या. यात मंत्री गडाख यांच्यासह परिवारातील सदस्यांची नावे घेतली होती. या प्रकरणात आरोपींमध्ये मंत्री गडाख यांचा समावेश नसला, तरी त्यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

24 मार्च रोजी या अर्जावर पहिली सुनावणी होऊन त्यानंतर 28 मार्च रोजी सुनावणी पार पडली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. पुष्पा कापसे- गायके यांनी बाजू मांडत जामिनाला विरोध दर्शवला होता.

तर गडाख यांच्यावतीने अ‍ॅड. अमित झिंजुर्डे यांनी बाजू मांडली. तपासी अधिकार्‍यांकडूनही म्हणणे सादर करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुर्तडीकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मंत्री गडाख यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. गडाख यांनी तपास अधिकार्‍यांना तपासात सहकार्य करावे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe