Ahmednagar Loksabha Election : विखेंच्या ग्राउंडवर आमदार लंके यांची विकेट ? शिवस्वराज्य यात्रेकडे नगरकरांनी फिरवली पाठ, पारनेरकर मात्र फुल जोमात

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Loksabha Election

लोकसभा लढवू इच्छिणाऱ्या आमदार निलेश लंके यांची शिवस्वराज्य यात्रा विखे यांच्या साखर पेरणी पुढे फिकी

Ahmednagar Politics News : सध्या अहमदनगर मध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कदाचित आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे हे पडसाद असू शकतात. खरंतर लोकसभेची निवडणूक आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपली आहे.

यामुळे राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या संघटनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे इंडिया आघाडीकडून लोकसभा डोळ्यापुढे ठेवून तयारी सुरू आहे तर दुसरीकडे राज्यात नुकतीच तयार झालेली महायुती देखील निवडणुकीसाठी मैदानात उतरली आहे.

महायुतीचा आज पहिला-वहिला मेळावा देखील पार पडला आहे. या मेळाव्याचा मान अहमदनगरला मिळाला हे विशेष. आज अहमदनगर मध्ये दोन महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्यात. एकतर आज महायुतीचा पहिला-वहिला मेळावा संपन्न झाला आणि दुसरा म्हणजे आमदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण मतदार संघातून काढलेली शिवस्वराज्य यात्रेची सांगता झाली.

खरे तर महायुतीचा मेळावा हा नियोजित होता. परंतु, राणी लंके यांची शिवस्वराज्य यात्रेची एवढ्या लवकर सांगता होईल हे वाटत नव्हते. राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूक लढवणारच असा निर्धार त्यांनी केला आहे.

एक तर स्वतः निवडणूक लढवणार नाहीतर माझे पती निवडणूक लढवणार असे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक नगर दक्षिण जागेसाठी जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा निलेश लंकेच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीकडून निलेश लंके या जागेसाठी परफेक्ट उमेदवार होते. मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि निलेश लंके यांनी अजितदादा गटात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला.

आता अजितदादा गट महायुतीत आहे. महायुतीकडून या जागेसाठी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील हे या जागेसाठी जवळपास निश्चित झालेले नाव आहे. यामुळे निलेश लंके यांचे नाव महायुतीकडून पुढे येणे जवळपास अशक्य वाटत आहे.

हेच कारण असावे की, राणी लंके यांनी या लोकसभेतून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. म्हणजेच पक्षातून तिकीट मिळाले तर ठीक नाहीतर अपक्ष किंवा दुसऱ्या पर्याय शोधून निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. यासाठी नगर दक्षिण मतदार संघातून त्यांनी शिवस्वराज्य यात्रा देखील काढली.

या निमित्ताने त्यांनी जनमानसांच्या मनात काय सुरू आहे याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, या यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवप्रभूंचे विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न लंकेनी केला. ही यात्रा 3 जानेवारीपासून सुरू झाली. पाथर्डी येथील मोहटा देवीचे दर्शन घेऊन राणी लंके यांनी या यात्रेची सुरुवात केली.

तर या यात्रेची सांगता नगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टीवर जाऊन त्यांचे अभिवादन करून झाली. यावेळी राणी लंके यांनी भाषणही केले. यात्रा नगर शहरातील सक्कर चौकातून सुरू झाली. यावेळी राणी लंके यांनी यात्रेला दिलेल्या प्रतिसादाबाबत नागरिकांचे आभार मानले.

मात्र, या यात्रेकडे नगरकरांनी पाठ फिरवली असे चित्र अनुभवायला मिळाले. यात्रेत पारनेरकर खूप मोठ्या संख्येने होते मात्र नगरकरांनी याकडे पाठ फिरवली. वास्तविक, या यात्रेत नगरकर मोठ्या संख्येने येतील असे वाटत होते मात्र नगरकरांनी याकडे पाठ फिरवली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अहमदनगर दक्षिण मधून सध्या भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार आहेत. त्यांनी मतदारसंघात आगामी लोकसभा डोळ्यापुढे ठेवून मोफत साखर वाटप आणि चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.

त्यामुळे लोकसभा लढवू इच्छिणाऱ्या लंके यांची शिवस्वराज्य यात्रा विखे यांच्या साखर पेरणी पुढे फिकी पडली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता लोकसभा लढवू इच्छिणारे लंके पुढे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण नगरकरांचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe