बिग ब्रेकिंग : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कालच पद्मभूषण पुरस्कार मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पिचाई यांच्यासहीत कंपनीच्या पाच जणांविरोधात कॉपीराईट अधिनियमाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दर्शन यांचा ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा सिनेमा युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.

कोणतेही हक्क न घेता अधिकार नसलेल्या लोकांमार्फत गुगलने हा सिनेमा युट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचा आरोप दर्शन यांनी केला आहे. त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा दर्शन यांनी केला आहे. दर्शन यांच्या या तक्रारीमुळे पिचाई हे अडचणीत आले आहेत.

कॉपीराईटचं उल्लंघन झाल्याचा दावा करत सुनील दर्शन यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि अन्य पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अधेरी पश्चिमेतील एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कॉपीराइट अॅक्ट 1957च्या कलम 51, 63 आणि 69 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

सुनील दर्शन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 2017मध्ये त्यांचा एक हसीना थी हा शेवटचा सिनेमा केला होता. मात्र, त्यांची परवानगी न घेता हा सिनेमा युट्यूबवर डाऊनलोड केल्याचा त्यांचा आरोप आहे.