ATM वरचं Cancel बटन दोनदा दाबलं तर तुमचा पिन सुरक्षित राहतो का? काय आहे सत्य? वाचा

एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबा, त्यामुळे तुमच्या एटीएम कार्डचा पिन सुरक्षित राहील, असा मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. विशेष म्हणजे ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली असल्याचा दावाही, या मॅसेजमध्ये करण्यात आला होता. परंतु हा मॅसेज खरा आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडला. आता याच प्रश्नाचं उत्तर पीआयबीनं दिलंय.

काय आहे सत्य?

हा दावा सपशेल खोटा असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे. रिझर्व्हने असा कोणताही संदेश प्रसिद्ध केलेला नाही. रिझर्व्ह बँकेकडून अशी कोणतीही सूचना नाही. रद्द करा बटण दोनदा दाबल्याने पिन चोरी रोखता येईल, असं म्हणता येत नाही, असं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं हे. पीआयबी हे भारत सरकारचे अधिकृत फॅक्ट चेकिंग हँडल आहे.

एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी?

– तुमचा पिन लक्षात ठेवा. ते कुठेही लिहून ठेवू नका.
– तुमचा पिन किंवा कार्ड कोणाशीही शेअर करू नका.
– एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर, पिन टाकताना कीपॅड हाताने झाकून ठेवा.
– जर एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर ताबडतोब कार्ड जारी करणाऱ्या बँकेला कळवा.