Farming News : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागात मशागतीची कामे खोळंबली होती.
दरम्यान मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नाही. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके आदींबाबत तक्रार निवारण करण्यासाठी जिल्ह्यात १६ तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर ते या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करता येणार आहे. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणे किंवा खते विकल्यास कारवाई होईल, असा इशारा कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाने दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात १६ तक्रार निवारण कक्ष
जिल्ह्यात एकूण १६ तक्रार निवारण केंद्र आहेत. प्रत्येक तालुक्यात एक असे १४ निवारण केंद्र तालुकास्तरावर आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे एक व जिल्हा परिषदेत एक तक्रार निवारण केंद्र आहे.
सकाळी ९:३० ते रात्री ७ पर्यंत कक्ष सुरू राहणार
शेतकऱ्यांना तक्रार करता यावी, यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ९:३० ते रात्री ७ या वेळेत बियाणे, खते, आदींबाबत शेतकरी आपल्या तक्रारी करू शकतील.
कोणत्या तक्रारी करता येणार?
खते, बियाणे, कीटनाशके दर्जेदार नाहीत, शासकीय दरापेक्षा अधिक किंमत आकारली जाते, बियाणे उगवले नाही, अशा विविध प्रकारच्या तक्रारी शेतकरी करू शकतात
या नंबर्सवर करा संपर्क
कृषी विभागाच्यावतीने तक्रारींसाठी जिल्हा परिषदेतील या क्रमांकावर ७५८८१७८८४२ तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या या ७५८८५५६२७९ क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क करावा. वरील दोन्ही क्रमांकावर व्हॉट्स अॅपद्वारेही तक्रार करता येऊ शकते.
तक्रारीसोबत काय द्यावे लागणार?
तक्रारीसोबत शेतकऱ्यांनी बियाणे, खते किंवा कीटकनाशके याचे पक्के बिल, तक्रारीचे स्वरूप आदी माहिती तक्रार निवारण कक्षाला देणे आवश्यक आहे. काही बियाणे अथवा खत शिल्लक ठेवले असल्यास तेही द्यावे.