Gold Price 2025 Prediction : सुरक्षित गुंतवणूक म्हणून नवीन वर्षात सोन्याची लकाकी वाढणार आहे. परिणामी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,००० रुपयांवर जाऊ शकतो. त्यातही भौगोलिक-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम राहिल्यास देशांतर्गत सराफ बाजारातील किमती ९० हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाऊ शकतात.
नाणेनिधी धोरणातील मवाळ भूमिका आणि मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदीही सोन्याच्या दरात वाढ होण्यास मदत करत आहे. पण भौगोलिक-राजकीय संकट कमी झाल्यास, त्याचबरोबर रुपयाची घसरण थांबल्यास सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात, असे मत सराफ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले.
मावळत्या वर्षात किमतींनी नवनवीन शिखर गाठल्यामुळे जोरदार कामगिरी करत या काळात देशांतर्गत बाजारात सोन्यामध्ये २३ टक्के परतावा दिला. ३० ऑक्टोबर रोजी पिवळ्या धातूने ८२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला. चांदीनेही चमकदार कामगिरी केली आणि ३० टक्क्यांच्या वाढीसह १ लाख रुपये प्रतिकिलोची पातळी ओलांडली. जागतिक अनिश्चिततेमध्ये सोन्याचे आकर्षण वाढले आहे. भौगोलिक राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकेची खरेदी आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर कमी करण्याकडे असलेला कल यामुळे नवीन वर्षात सोन्याची चमक कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार नवीन वर्षात सोन्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. देशांतर्गत सोन्याचा भाव ८५ ते ९० हजार रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. भौगोलिक राजकीय तणाव कायम राहिला किंवा वाढला, तर चांदीच्या किमती किरकोळ वाढीसह एक ते दीड लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात.मध्यवर्ती बँकांच्या निर्णयाचा सराफा बाजाराच्या घडामोडींवर परिणाम होईल.
सराफा बाजारासाठी व्याजदराचे चक्र देखील महत्त्वाचे आहे, कारण जागतिक स्तरावर दर घसरल्याने बाजारात तरलता येईल आणि अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. असे झाल्यास सोन्याच्या किमतीला चालना मिळेल. तथापि, व्याजदरात कपात करण्याबाबतीत अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हेच्या सावध पवित्र्यामुळे किंमत वाढीचा वेग कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त वैविध्यकरणाच्या धोरणांमुळे आणि चलन स्थिरतेच्या चितमुळे मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी चालू राहिल्याने सराफाला मजबूत आधार मिळेल, असे त्रिवेदी म्हणाले.
अस्थिर वातावरणाचा सराफा व्यवसायावर परिणाम
सोने आणि चांदीच्या बाजारांवर अशांत भौगोलिक- राजकीय वातावरणाचा थेट परिणाम झाला आहे. परिणामी किमतीमध्ये सामान्यतः २-३ टक्के वाढ झाली आहे, यामुळे मौल्यवान धातूला जास्त पसंती मिळत आहे. कॉमट्रेंड्झ रिसर्चचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानशेखर त्यागराजन यांच्या मते, रुपयाचे आणखी अवमूल्यन होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे येत्या वर्षात आंतरराष्ट्रीय किमतींच्या तुलनेत स्थानिक किमतीतील घसरण थांबेल. देशांतर्गत बाजारात या वर्षी जुलैमध्ये सोन्याच्या आयात शुल्कात ६ टक्क्यांनी कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सोन्याच्या किमतीत ७ टक्क्यांनी मोठी घसरण झाली.
तर दोन अंकी परतावा अपेक्षित
नवीन वर्षामध्येदेखील सोने दोन अंकी परतावा देण्याची अपेक्षा एंजेल वनचे संशोधन विश्लेषक प्रथमेश मल्ल्या यांनी व्यक्त केली. कोटक सिक्युरिटीजचे चलन आणि कमोडिटी रिसर्चचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी म्हणाले, मजबूत किरकोळ मागणी आणि मध्यवर्ती बँकेच्या खरेदीनेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. केंद्रीय बँका गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षी १,००० टनांपेक्षा जास्त सोने खरेदी करत आहेत. चीन सर्वात मोठा खरेदीदार म्हणून उदयास आला आहे, ज्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. खरेदीच्या विक्रमाने वर्षाची सर्वात मजबूत सुरुवात केली आहे