IPL 2024 : हार्दिक मुंबईकडे आला तरी कसा ? व्यवहार कोट्यवधींचा पण खुलासा नाही…

Ahmednagarlive24 office
Published:
IPL 2024

IPL 2024 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्यावरून गेले दोन दिवस सुरू असलेले नाट्य अखेरीस संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी मोजून हार्दिकला गुजरात टायटन्सकडून आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले.

कर्णधार हार्दिकने गुजरात सोडल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सलामीवीर शुभमन गिलची वर्णी लागली आहे.

गुजरातचा कर्णधार हार्दिक मुंबईकडे जाणार, अशी चर्चा आयपीएल वर्तुळात रंगली होती. मात्र, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंची यादी कायम राखण्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी गुजरातने त्याला कायम खेळाडूंच्या यादीत स्थान दिले. यावरून हार्दिक गुजरातमध्येच राहणार, असे स्पष्ट झाले होते.

मात्र, तो गुजरातकडे राहणार असला तरी मुंबईच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. त्यामुळे हार्दिकच्या गुजरातमधील सहभागावरून संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस रविवारी रात्री पडद्यामागून हालचाली झाल्या आणि हार्दिक गुजरात सोडणार असल्याचे निश्चित झाले.

मात्र, मुंबईकडे तो पुन्हा जाणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. यामुळे हार्दिक नक्की कुठल्या संघाचे प्रतिनिधित्व करणार, याबाबतचा गुंता आणखी वाढला होता. अखेरीस हार्दिक मुंबईकडे परतल्याची घोषणा करण्यात आली.

हार्दिकच्या बदल्यात मुंबई १५ कोटींची रक्कम गुजरातला देईल. याशिवाय खेळाडू स्थानांतरणाची मोठी रक्कमही गुजरातला देण्यात आली आहे; परंतु या आकडेवारीचा खुलासा करण्यात आला नाही.

हार्दिकला या रकमेतील मोठा वाटाही वैयक्तिक खात्यात वळता करता येईल. मुंबईच्या मालक नीता अंबानी आणि आकाश अंबानी या दोघांनीही हार्दिकचे पुनरागमन ‘आनंदी घरवापसी’ असल्याचे वर्णन केले.

हार्दिकचे घरी स्वागत करताना आनंद होत आहे. मुंबईच्या कुटुंबासोबत हे एक आनंदाचे पुनर्मीलन आहे. टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत मोठा पल्ला त्याने गाठला आहे. त्याच्या आणि मुंबईच्या भविष्याबद्दल उत्सुकता असल्याची प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली आहे.

गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना आनंद आणि अभिमान वाटतो. बलाढ्य संघाचे नेतृत्व करण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रेन्चाइझीचे आभार. आमच्याकडे दोन विलक्षण हंगाम आहेत. रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. – शुभमन गिल

ग्रीन बंगळुरूच्या चमूत मुंबईला सोडचिठ्ठी देत अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन बंगळुरूकडे परतला आहे. मुंबई आणि बंगळुरू संघांत ग्रीनवरून झालेला आर्थिक व्यवहार तब्बल १७.५ कोटींचा आहे. गत हंगामात ग्रीनने शतक, दोन अर्धशतकांनी ४५२ धावा काढताना १६ लढतींत ६ बळी घेतले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe