उद्या समृद्धी महामार्ग लोकार्पण : ह्या वेळेपासून वाहतूक सेवा खूली होणार !

Ahmednagarlive24 office
Published:

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ,११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे‌‌.

या कार्यक्रमाचे शिर्डी इंटरचेंज येथून लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. या प्रक्षेपण कार्यक्रमाच्या पूर्व तयारी, सोयी-सुविधांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज शिर्डी इंटरचेंज येथे पाहणी केली.

पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपूते, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे आदी अधिकारी उपस्थित होते.

उद्या ,११ डिसेंबर रोजी शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रेक्षपण कार्यक्रमास महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पंधराशे ते दोन हजार‌ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी बंदीस्त मंडप उभारण्यात आला आहे. लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी १२ बाय १८ फूट उंचीचे २ एलईडी उभारण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर दुपारी २ वाजेनंतर वाहतूक व दळणवळण सेवा सर्वसामान्यांसाठी खूली होणार आहे‌.

शिर्डी इंटरचेंज समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठा इंटरचेंज

समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर दरम्यान २४ इंटरचेंज (प्रस्थान मार्ग) आहेत. यात शिर्डी इंटरचेंज सर्वात मोठा आहे‌. या इंटरचेंज वर १६ टोल नाके (मार्गिका) आहेत‌. या १६ मार्गिकेच्यावर मध्यभागी एकच आधारस्तंभ असलेली सर्वात मोठी छत्री (canopy) आहे.

मनमाड- अहमदनगर, पुणतांबा – झगडे फाटा व सिन्नर-शिर्डी तीन राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना समृद्धी महामार्गावर शिर्डी इंटरचेंज येथून छेदून जातात. अशी माहिती प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपुते यांनी दिली.

समृद्धी महामार्गात अहमदनगर हद्दीत मनमाड- दौंड रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल व गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूल हे सर्वात आव्हानात्मक काम होते. सदर काम वेळेत पूर्ण करण्याचे समाधान आहे. अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता यशवंत पाटील यांनी दिली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe