Ahmednagar News : ज्या कोरडगावच्या परिसराने निवडणुकीत तुम्हाला बळ दिले तोच परिसर दुष्काळात बसत नाही. ज्यांनी तुम्हाला तारले, त्यांनाच विसरले. हे बरे नाही. गोकुळभाऊ दौंड यांनी सुरु केलेले उपोषण हे सामान्य माणसांसाठी आहे.
त्यांचा आवाज मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्रालयाच्या दारात येऊन बसू, असा इशारा शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी दिला आहे.
येथील स्व. वसंतराव नाईक चौकात पाथर्डी-शेवगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी गोकुळभाऊ दौंड यांनी सर्वपक्षीय उपोषण सुरू केले आहे. या वेळी शेतकरी संघटना, भाजपा ओबीसी सेल, राष्ट्रवादी, वंचीत बहुजन आघाडी, सकल मराठा समाज व शेतकऱ्यांनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.
या वेळी रामकिसन शिरसाट, स्वाभिमानीचे बाळासाहेब गर्जे, कचरे पाटील, सकल मराठाचे सोमनाथ बोरुडे, बबलु वावरे, राष्ट्रवादीचे शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कुसळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नेमाने, स्वप्नील देशमुख, अनिल बंड, चाँद मणियार, आम आदमीचे किसन आव्हाड, शिवसेनेचे नवनाथ उगलमुगले, कानिफ आंधळे, वंचीतचे भोरु म्हस्के, सखाराम किर्तने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळ जाहीर करावा, ही प्रमुख मागणी आहे. दुष्काळ जाहीर करेपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा दौंड यांनी दिला आहे. बुधवारी आठवडे बाजार असल्याने आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ग्रामिण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपथित होते.
यावेळी लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच दुष्काळ जाहीर झाला नाही. राज्यात व केंद्रात त्यांचे सरकार आहे, मग अडचण कोणाची आहे, असा पश्न आंदोलकांनी उपस्थित करून लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
मी भाजापाचा कार्यकर्ता असून, सामान्य माणसाच्या दुष्काळाच्या प्रश्नांसाठी मी उपोषण सुरु केले आहे. येथे पक्षीय संदर्भ नाही. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठींबा दिला आहे. जोपर्यंत सरकार शेवगाव-पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करीत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच राहील.
ही लढाई गरीब विरुद्ध श्रीमंतांची सुरु आहे. सामान्य माणसाला तुम्ही का पिडता, हा प्रश्न आहे. मी भाजापाचा असलो तरी सामान्य माणुस माझा आधार आहे. त्यांच्यासाठी हा संघर्ष उभा केला आहे. – गोकुळभाऊ दौंड, जिल्हाध्यक्ष, ओबीसीसेल भाजपा
राज्यात व केंद्रात सरकार भाजापचे आहे. स्थानिक आमदार भाजपाच्या आहेत. मग दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाच उपोषण करण्याची वेळ येते. हे नेमके चाललंय काय? दुष्काळ जाहीर करायला अडचण नेमकी कोणाची?
कोणाची लढाई कोणाविरुध्द सुरू आहे. तुम्ही सामान्य माणसाला आधार देणार नसाल तर मग पक्ष व पदे काय कामाची आहेत, असा प्रश्न गोकुळभाऊ दौंड यांनी उपस्थित केला आहे.