नासा भारतीयाला पाठवणार अंतराळात ! भारताला अंतराळ स्थानकासाठी मदतीचीही तयारी

Ahmednagarlive24 office
Published:
NASA

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ पुढील वर्षी एका भारतीय अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवणार आहे. अमेरिकेने भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदतीचीही तयारी दर्शवली आहे.

भारत दौऱ्यावर आलेले नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी यासंदर्भात माहिती दिली. भारतीय अंतराळवीराची निवड नासा करणार नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून या अंतराळवीराची निवड करण्यात येईल.

या अंतराळवीराला पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याच्या योजनेवर नासा आणि इस्रो काम करत असल्याचे नेल्सन यांनी सांगितले. भारताची इच्छा असेल तर आम्ही इस्रोला स्वतंत्र अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी मदत करण्यासही तयार आहोत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला २०३५ सालापर्यंत भारताचे अंतराळ स्थानक तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय २०४० सालापर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरेल यादृष्टीने आपला अंतराळ कार्यक्रम तयार करण्याचे आवाहनही मोदींनी इस्रोला केले आहे.

या पार्श्वभूमीवर नासाने इस्रोला सहकार्य करण्याची दर्शवलेली तयारी विशेष महत्त्वाची आहे. नासा आणि इस्रो यांच्या भागीदारीतून निसार नावाचा एक संयुक्त उपग्रह देखील तयार करण्यात येत आहे.

पृथ्वीच्या अभ्यासासाठी असलेल्या या उपग्रहाचे येत्या तीन-चार महिन्यांत प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारताच्या जीएसएलव्ही रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe