अहमदनगर दि.1- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत युवकांकरिता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिनांक ०१/१२/२०२३ रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, पारनेर जि. अहमदनगर येथे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते रोजगार मेळाव्याचे उघ्दाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी तरुणांना रोजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता असून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून स्वत:चा तसेच पर्यायाने देशाचा विकास केला पाहिजे असे प्रतिपादन करुन रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक, श्री निशांत सूर्यवंशी, सहायक आयुक्त कौशल्य विकास यांनी केले. प्रास्ताविकात श्रम व श्रमाला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक असून युवकांनी रोजगार स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन स्वत:च्या जीवनाला योग्य दिशा दिली पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री वसीम पठाण, श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, यांनी मुलाखतीचे तंत्र करिअर मार्गदर्शन, कौशल्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. उघ्दाटन कार्यक्रमास उपस्थितांचे श्री रविकुमार पंतम कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी आभार मानले.
उपरोक्त रोजगार मेळाव्यामध्ये एकुण 29 आस्थापनांनी रिक्तपदे अधिसूचित केली होती. तसेच जिल्हयामध्ये कार्यरत एकुण 8 महामंडळाचे अधिकारी प्रतिनीधी स्वंयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यास उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात नामाकिंत कंपन्यांकरिता नोकरीसाठी मुलाखती, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती, रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची संधी इ. बाबी एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या.
सदर विभागीय रोजगार मेळाव्यास एकूण 1384 नोकरी इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास नोंदणी केलेली होती तथापी प्रत्यक्षात 464 उमेदवारांनी उपस्थित राहून मेळाव्यात मुलाखती दिल्या. यापैकी 140 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आलेली असून प्रायोगिक तत्वावर नियुक्त पत्रेही देण्यात आलेली आहेत. तसेच 163 उमेदवारांची प्राथमिक निवड झालेली असून 65 उमेदवारांनी स्वयंरोजगार करण्यास्तव व 60 उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षण मिळण्यास इच्छुकता दर्शविली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल बागुल यांनी यांनी केले. तसेच रोजगार मेळावा यशस्वी होण्याकरिता कौशल्य विकास विभागाचे श्री आव्हाड, श्री वाघ, श्री चव्हाण, श्रीम मोरे, श्रीम मोढवे, श्री बोठे, श्री नलावडे, श्री नितीन जाधव, श्री दानिश शेख, श्री भागवत, श्री उकिर्डे, श्री डिसले, श्री उगले तसेच श्रीम कूरापाटी यांनी परिश्रम घेतले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री विश्वनाथ दादा कोरडे, श्री सखाराम भागवत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.