अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी बीड जिल्ह्यातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथ यांची महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचे नियम पाळून भाविकांसाठी दर्शन आणि वैद्यनाथ मंदिराचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहेत. दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.
परंतु, महाशिवरात्रीची यात्रा मात्र यंदाही भरणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातून समोर आले आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाशिवरात्री यात्रेवर मोठे निर्बंध होते.
मात्र, यावर्षी पहिल्यांदाच कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असताना ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय.
तसेच, सलग तीन वर्ष यात्रा रद्द झाल्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. तर, काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ येथील महाशिवरात्री यात्रा कोरोनामुळे रद्द केली.
औंढा नागनाथनंतर परळी येथील प्रभु वैद्यनाथ महाशिवरात्री यात्राही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.