Guru Pradosh 2025 | प्रदोष व्रत हे भगवान शिव यांना समर्पित एक अत्यंत शुभ व्रत मानले जाते. सनातन धर्मानुसार हे व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला साजरे केले जाते. दर महिन्यात दोन वेळा येणारे हे व्रत, अमावस्येपूर्वी व पौर्णिमेपूर्वी येते. या व्रताचे पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना अपार आशीर्वाद देतात. प्रदोष व्रतादिवशी शिवमंदिरात विशेष पूजा केली जाते, शिवलिंगावर जलाभिषेक, फळ-फुलांचा नैवेद्य, मंत्रोच्चार आणि आरती केली जाते. या दिवशीचे व्रत केल्याने पापमुक्ती, सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते. विशेषतः गुरु प्रदोष व्रत गुरुवारी आल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते.
या महिन्यात गुरु प्रदोष व्रत संध्याकाळी 6:54 वाजता सुरू होऊन रात्री 9:11 वाजता समाप्त होईल. या वेळेत भगवान शिवाची विधिपूर्वक पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. यंदाच्या गुरु प्रदोष व्रताला अभिजीत मुहूर्त आणि रवि योग यांसारखे अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रात या योगांचा विशेष उल्लेख असून, या वेळी पूजा केल्यास भक्तांचे जीवनातील संकट दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

लक्ष्मीकृपेसाठी ‘हा’ उपाय करा-
या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनात मोठे बदल घडू शकतात. जर आर्थिक अडचणी भेडसावत असतील, तर महादेवाला सुका मेवा अर्पण करून शिव मंत्र जप करावा. यामुळे धनसंपत्तीची वाढ होते. करिअरमध्ये अडथळे जाणवत असतील, तर या दिवशी उपवास ठेवून प्रसाद म्हणून पांढरी बर्फी अर्पण करावी. यामुळे चंद्रदोष दूर होतो आणि यशप्राप्ती होते. जर घरात मानसिक अशांती किंवा संघर्ष वाढले असतील, तर भगवान शिवाला भांग व धतूरा अर्पण करणे फायदेशीर ठरते. देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-शांती व स्थैर्य नांदते.
अविवाहित मुलींनी करावे ‘हे’ उपाय-
अविवाहित मुलींनी या दिवशी सात्विक अन्नच सेवन करावे. विशेषतः कन्या राशीच्या व्यक्तींनी संत्री, केळी, सफरचंद, दूध, दही, साबुदाण्याची खिचडी आणि बटाटे खाल्ले पाहिजेत. यामुळे विवाह योग सक्रिय होतात आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतात. तसेच शिवपूजा करावी.
शिवपूजेची पद्धत साधी आणि प्रभावी असते. सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पूजास्थान स्वच्छ करून शिवमूर्तीची स्थापना करावी. त्यावर दूध-मिश्रित जल अर्पण करावे. फळ, फुले, धूप व दिवा अर्पण करून मंत्रोच्चारसह शिवाची आरती करावी आणि आशीर्वाद मागावा.
गुरु प्रदोष व्रत हे केवळ व्रत नसून एक शक्तिशाली आध्यात्मिक योग आहे. योग्य पद्धतीने व श्रद्धेने पूजा केली, तर सुख, समृद्धी, आरोग्य आणि सौख्याचे द्वार उघडू शकते.