चेक पास झाला नाही म्हणून आरोपीस 8 लाख रुपयाचा दंड, श्रीराम फायनान्स कंपनीला न्यायालयात मोठे यश

Shriram Finance News : श्रीराम फायनान्स कंपनी बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी (आताची श्रीराम फायनान्स) कंपनीला न्यायालयात मोठे यश मिळाले आहे.

कंपनीने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात न्यायालयाने कर्जदारास कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. खरेतर कंपनीने दिलेल्या वाहन कर्जासाठी कर्जदाराने दिलेला धनादेश वठला नाही यामुळे कर्जदार शिवाजी बापूराव बढे याच्या विरोधात कंपनीकडून फौजदारी खटला दाखल करण्यात आला.

यात आरोपी बढेला दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आले आहे. आरोपी शिवाजीने ESCORT TRX 1550 वाहन खरेदीसाठी ₹9,05,000/- इतके वाहन कर्ज तसेच ₹39,260/- रुपये इंधन कर्ज घेतले होते. पण आरोपीने परतफेडीकरिता दिलेला धनादेश वठला नाही.

यामुळे कंपनीने या प्रकरणी NI Act कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा खटला 19वे संयुक्त दिवाणी न्यायाधीश आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतले. यात आरोपीला सादर करण्यात आलेल्या पुराव्याचा विचार करून दोषी ठरवले. त्याला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 255(2) नुसार चार महिन्यांची साधी कैद व 8,01,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दंड न भरल्यास आरोपीस 15 दिवसांची अतिरिक्त साधी कैद भोगावी लागणार आहे. तसेच कलम 357(1) नुसार दंडातून ₹7,98,000/- रक्कम फिर्यादी कंपनीस परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात फिर्यादी कंपनीच्या वतीने अॅड. बी. एम. काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

न्यायालयाचा हा निर्णय आर्थिक संस्थांना संरक्षण देणारा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. चेक बाऊन्ससारख्या प्रकरणांवर कठोर कारवाई होऊन भविष्यातील फसवणुकीस आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.