जगभरात कसोटी क्रिकेटसाठी विशेष मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन सातत्यपूर्ण राहिले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये केवळ सामन्यांचे नव्हे, तर वैयक्तिक फलंदाजांच्या कामगिरीचेही महत्व आहे. विशेषतः 50 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांकडे लक्ष दिलं जातं कारण ते खेळाच्या महत्त्वाच्या क्षणी संघाला स्थैर्य आणि दिशा देतातभारतासाठी या WTC मध्ये अनेक दिग्गजांनी जबरदस्त योगदान दिलं आहे, मात्र एका नवख्या खेळाडूने गेल्या काही सामन्यांत इतकी अफलातून कामगिरी केली आहे की त्याचं नाव आता टॉप 5 मधील फलंदाजांमध्ये गणलं जात आहे. हा खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल, ज्याने आता विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्याही पुढे झेप घेतली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने 87 धावा केल्या. केवळ 13 धावांनी शतक हुकलं, पण त्याचं सातत्य पुन्हा एकदा समोर आलं. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध WTC अंतर्गत खेळलेल्या प्रत्येक कसोटीत त्याने 50 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचं हे सातत्य लक्षणीय आहे आणि त्याने आता WTC इतिहासात 50+ धावांच्या बाबतीत टॉप 5 भारतीय फलंदाजांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.

ऋषभ पंत
या यादीत सर्वात वरचं स्थान सध्या ऋषभ पंतच्या नावावर आहे. 62 डावांमध्ये त्याने 19 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. एक अष्टपैलू आणि धाडसी खेळाडू म्हणून ओळख असलेला पंत, अनेकदा कठीण परिस्थितीत भारताला सावरण्याचं काम करत आला आहे.
रोहित शर्मा
दुसऱ्या स्थानावर आहे रोहित शर्मा. हिटमॅनने 66 डावांमध्ये 17 वेळा ही कामगिरी केली आहे. त्याचा खेळलेला प्रत्येक डाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो, विशेषतः जेव्हा तो त्याच्या शैलीदार खेळीने सामन्याचं पूर्ण रूपच बदलून टाकतो.
यशस्वी जयस्वाल
तिसऱ्या क्रमांकावर, यशस्वी जयस्वाल नाव ठामपणे दिसतं. केवळ 39 डावांमध्ये त्याने 16 वेळा 50+ धावा केल्या आहेत. हा आकडा पाहता, त्याचं सातत्य आणि खेळावरचं नियंत्रण किती जबरदस्त आहे हे लक्षात येतं. केवळ काही कसोट्यांत खेळूनदेखील त्याने कोहली आणि पुजारासारख्या खेळाडूंशी खांद्याला खांदा लावणारी कामगिरी केली आहे.
चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजारा, जो सध्या संघाबाहेर आहे तो यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 62 डावांमध्ये 16 वेळा 50+ धावा केल्या आहेत. त्याच्या शैलीत आणि संयमात कसोटी क्रिकेटचं खरं रूप पाहायला मिळालं, जे सध्याच्या आक्रमक युगात दुर्मिळ होत चाललं आहे.
विराट कोहली
पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कसोटी क्रिकेटमधून नुकत्याच घेतलेल्या निवृत्तीमुळे त्याची ही यादीतली कामगिरी आणखी महत्वाची ठरते. 79 डावांतून त्याने 16 वेळा ही कामगिरी केली असून, त्याच्या नावावर शतके आणि अर्धशतके दोन्हींची लक्षणीय संख्या आहे.