अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
दरम्यान आज अनेक जणांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहत आपली भावना व्यक्त केली आहे. यातच ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे.
आशा शब्दांत हजारे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. हजारे यांनी म्हटले आहे, ‘भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात.
त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. लतादीदींना भेटण्याचा प्रसंग अनेक वेळा आला.
त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. त्यांची देशभक्तीपर गीत ऐकताना आजही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते., असे अण्णांनी आठवणींना उजाळा देताना म्हंटलेय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम