Chandrayaan 3 : विक्रम लँडरने मोजला चंद्रावरील भूकंप !

Updated on -

Chandrayaan-3 : चांद्रयान- ३ मोहिमेतील विक्रम लँडरवरील इन्स्ट्रूमेंट ऑफ लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी अर्थात इल्सा नामक उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपाची नोंद केली आहे. हा भूकंप २६ ऑगस्ट रोजी आला होता. इस्रोने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

इल्सा हे मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानावर आधारित उपकरण प्रथमच चंद्रावर पाठवण्यात आले आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरताना निर्माण होणारी कंपने इल्साकडून मोजण्यात येत आहेत. मात्र २६ ऑगस्ट रोजी नोंदवलेली कंपने नैसर्गिक होती.

या कंपनांचा स्रोत शोधण्यात येत असल्याचे इस्रोने सांगितले. पृष्ठभागावरील अगदी सूक्ष्म कंपने टिपण्यास इल्सा सक्षम आहे. इस्रोने आपल्या दुसऱ्या ट्विटद्वारे लँडरवरील रेडिओ अनॉटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेंसिटिव्ह आयनोस्फियर अँड ॲटमॉस्फियर अर्थात रंभा नामक उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागालगत वातावरणात प्लाझ्माचे संकेत दिल्याची माहिती दिली.

प्लाझ्मा एक प्रकारचा आयोनाईज्ड वायू आहे. प्राथमिक चाचणीत प्लाझ्माचा हा थर विरळ असल्याचे दिसते. यापूर्वी लँडरवरील ‘चंद्र सर्फेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट’ अर्थात चास्ते नामक उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरील आणि पृष्ठाभागाखालील तापमान मोजून त्याचा आलेख पाठवला होता.

तर प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील मातीचे नमुने तपासून पृथ्वीच्या या उपग्रहावर सल्फर अर्थात गंधक असल्याचे सांगितले आहे. सल्फरसोबतच अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅग्नीज, सिलिकॉन ही महत्त्वाची खनिजे आणि ऑक्सिजन देखील आढळले असून हायड्रोजनचा शोध सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe