अरे बापरे! मोबाईल वापरण्यात भारत जगात आघाडीवर, भारतातले लोक दररोज एवढा वेळ घालवतात मोबाईलमध्ये?

भारतीय दररोज सरासरी ५ तास स्मार्टफोनवर घालवत असून, सोशल मीडिया, गेमिंग व व्हिडीओ पाहण्यात ७०% वेळ जातो. ५जी वापर, मोबाईल उत्पादन आणि डिजिटल मीडिया उद्योग वेगाने वाढत असून, दैनंदिन सवयी बदलत आहेत.

Published on -

स्मार्ट फोनचा वापर भारतात झपाट्याने वाढत असून, २०२४ मध्ये भारतीयांनी एकूण १.१ लाख कोटी तास (१.१ ट्रिलियन तास) मोबाईलवर घालवले आहेत. हे आकडे केवळ तांत्रिक प्रगतीचे द्योतक नसून, बदलत्या जीवनशैलीचेही प्रतीक आहेत.

सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या डिजिटल क्षेत्रांना प्रचंड चालना मिळत आहे.

रोज ५ तास मोबाईलवर

भारतीय नागरिक दररोज सरासरी ५ तास स्मार्ट फोनवर घालवत आहेत. त्यातील तब्बल ७० टक्के वेळ सोशल मीडिया, गेमिंग व व्हिडीओ पाहण्यात जात आहे. या सवयीमुळे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र २.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे डिजिटल माध्यमांनी प्रथमच पारंपरिक टीव्ही माध्यमांना मागे टाकले आहे.

रोजागाराच्या संधी

आज हजारो तरुण कंटेंट क्रिएटर केवळ छोट्या व्हिडीओंमुळे लाखो रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने क्रिएटर इकॉनॉमीसाठी १ अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर केवळ मनोरंजनच नाही तर रोजगाराचाही मोठा स्रोत निर्माण झाला आहे.

5G वापरात भारत आघाडीवर

भारतामध्ये ५ जीचा वापर झपाट्याने वाढत असून, २०२४ मध्ये ५ जी वापरकर्त्यांची संख्या तीन पटीनं वाढली आहे. सध्या भारतात ५६.२ कोटी स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत – जी संख्या अमेरिका आणि मेक्सिकोच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. ५ जी वापरकर्ते दरमहा सरासरी ४० जीबी डेटा वापरत आहेत.

२०१४-१५ मध्ये भारताने केवळ २५ टक्के मोबाईल गरजा देशांतर्गत पूर्ण केल्या होत्या. आता हे प्रमाण वाढून ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. भारताचे एकूण मोबाईल उत्पादन २०२४ मध्ये ४.१ लाख कोटी रुपये झाले आहे.

तंत्रज्ञानाची सवय

मोबाईलचा इतका प्रचंड वापर केवळ तंत्रज्ञानाचा विजय नाही, तर आपल्या दैनंदिन सवयी, जीवनशैली आणि सामाजिक संवाद यावरही मोठा परिणाम करणारा बदल आहे. सार्वजनिक ठिकाणी – मेट्रो, बस, हॉटेल – सर्वत्र मोबाईल स्क्रीनमध्ये डोळे खिळलेले दिसतात. त्यामुळे नागरिकांचा मोठा वेळ सोशल मीडिया कंपन्यांच्या फायद्यासाठी खर्ची पडत आहे.

आयुष्यावर परिणाम

आपण ज्या स्क्रीनवर इतका वेळ घालवतो, त्या स्क्रीनचा आपल्या मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यावर नेमका कसा परिणाम होतो – हा एक महत्त्वाचा संशोधनाचा विषय ठरत आहे. स्मार्टफोन हे साधन आज केवळ संवादाचं नव्हे, तर संस्कृतीचं नवं माध्यम बनत चाललं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe