Buffalo Rearing :- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून भारतातील बहुसंख्य शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. आता या व्यवसायामध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून आता पशुपालन व्यवसाय केला जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले जाते व दुधाचे उत्पादन मिळावे हा त्यामागचा उद्देश असतो. पशुपालन व्यवसायातील आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हा दुधाचे उत्पादन हाच असतो. त्यामुळे साहजिकच या व्यवसायातून उत्तम नफा हवा असेल तर दुधाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळणे गरजेचे आहे व त्याकरिता गाय किंवा म्हशींच्या दर्जेदार आणि जातिवंत जातींची निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते.
याच अनुषंगाने म्हैस पालन सुरू करायचे असेल तर आपण काही म्हशीच्या प्रजातींची महत्त्वाची माहिती या लेखात बघणार आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायातून जास्तीचे दूध उत्पादन मिळणे शक्य होईल.
म्हैस पालनाकरिता म्हशींच्या जातिवंत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जाती
1- जाफराबादी म्हैस- म्हैस पालनाकरिता जाफराबादी या जातीची म्हैस खूप फायदेशीर आहे. साधारणपणे गुजरात राज्यातील ही म्हशीची जात असून या राज्यातील जाफराबाद या ठिकाणी तिचे मूळ वास्तव्य असल्यामुळे तिला जाफराबादी असे नाव पडले आहे. या म्हशीची जर दूध देण्याची क्षमता पाहिली तर ती ३० लिटरपर्यंत दूध देऊ शकते.वजनाने अतिशय जास्त असलेली ही जात दूध व्यवसायासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे म्हैस पालनामध्ये जाफराबादी जातीची म्हैस पाळून चांगल्या प्रकारे पैसा मिळवता येऊ शकतो.
2- मुर्रा म्हैस- महाराष्ट्रात देखील अनेक पशुपालक शेतकरी मुऱ्हा जातीच्या म्हशीचे पालन करतात व चांगला नफा मिळवत आहेत. मुरा जातीच्या म्हशीची दूध देण्याची क्षमता इतर जातींपेक्षा खूप चांगली आहे. जर आपण मुरा जातीच्या म्हशीच्या दुधाचे वैशिष्ट्य पाहिले तर ते अतिशय घट्ट असते व सात टक्के इतके फॅटचे प्रमाण त्यामध्ये असते. जर आपण भारताचा विचार केला तर हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये ही जास्त प्रमाणात पाडली जाते. तसेच बल्गेरिया, इटली व इजिप्त सारख्या देशांमध्ये देखील मुऱ्हा जातीच्या म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
3-सुरती म्हैस- म्हशींच्या जास्त दूध देणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्यामध्ये सुरती या जातीचा देखील समावेश केला जातो. गुजरात राज्यातील आनंद तसेच बडोदा या जिल्ह्यांमध्ये ही म्हैस जास्त प्रमाणात आढळून येते. हि म्हैस दख्खनी आणि गुजराती या नावाने देखील ओळखले जाते. तिची शारीरिक रचना पाहिली तर वजनाने ही हलकी असते व हिचे डोके लांब असते. सुरती जातीच्या म्हैस पालनाचा फायदा म्हणजे ही इतर म्हशीच्या जातींच्या तुलनेमध्ये खूप कमी चारा खाते व यामध्येच दुधाचे उत्पादन देखील चांगले देते त्यामुळे ही जात खूप फायदेशीर मानली जाते.
4- भदावरी म्हैस- म्हशींच्या जास्त दूध देणाऱ्या जातींमध्ये भदावरी ही देखील जात खूप उत्तम आहे. भदावरी आणि मुरा या दोन्ही जातींच्या म्हशीचा विचार केला तर ही मुर्रा जातीच्या म्हशीपेक्षा थोडे कमी दूध देते. परंतु भदावरी जातीच्या दुध हे उत्तम दर्जाचे तूप तयार करण्यासाठी ओळखले जाते. म्हशीची ही जात भदावर या परिसरामध्ये विकसित झाल्यामुळे तिला भदावरी हे नाव पडले आहे. वाढीव दूध उत्पादनाकरिता देखील ही जात महत्त्वाची आहे.