Ajab Gajab News : यंदाच्या ‘वर्ल्ड ओशन फोटोग्राफी’ या स्पर्धेत छायाचित्रकारांनी आपल्या बेशकिमती छायाचित्रांचा नजराणाच पेश केला. समुद्राचे, समुद्रातले आणि त्याच्यावर अवलंबून असलेले प्राण्यांचे,
माणसांचे, जलचरांचे आयुष्य कसे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक छायाचित्रकारानं आपापल्या परीने केला.

यातल्या लोआनिस इव्हान्जलिव्हीस या छायाचित्रकाराने खासच लक्ष वेधून घेतले. पश्चिम आफ्रिकेतल्या बेनिन येथल्या लेक नोकाऊमधील मानवी वसाहतीचे छायाचित्र त्याने काढले. ही वसाहत म्हणजेच ग्यानव्ही नावाचे गाव.
या गावाला तरंगते गावही म्हटले जाते. आफ्रिकेतली ही सर्वात मोठी तरंगती वस्ती म्हणून ओळखली जाते.सरोवरातल्या छोट्या-छोट्या बेटांवर घरे बांधलेली आहेत. काही घरे ही पाण्यातच आहेत. काही घरांनी फक्त बेटांचा फक्त आधार घेतला आहे. ग्यानव्ही गावात एकूण ३० हजार उंबरे आहेत.
नोकाऊ सरोवरातील मानवी वस्ती १७व्या शतकापासून आहे. टोफून या आदिवासी जमातीने इथे पहिले घर बांधले. टोफून इथे निर्वासित म्हणून आले होते. ते अगोदर सरोवराच्या किनाऱ्यावर रहायचे. फोन नावाच्या आदिवासी जमातीकडून टोफून आदिवासींवर अत्याचार होत होते.
फोन आदिवासी जमात काहीशी आक्रमक होती. टोफून जमातीतल्या आदिवासींना ते गुलाम म्हणून पोर्तुगीजांना विकायचे. या त्रासापासून वाचण्यासाठी टोफून आदिवासींनी सरोवरातल्या बेटांवर घरे बांधली. आता ही वस्ती जागतिक स्तरावर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
वर्षाकाठी इथे दहा हजारांहून अधिक पर्यटक येत असतात. १९९६ मध्ये या स्थळाला जागतिक वारसा हक्कांच्या यादीत युनेस्कोने टाकले. या गावात बँक, हॉटेल, मार्केट, शाळा, प्रार्थना स्थळे असे सर्व काही आहे.
घरं ही इबोनी लाकडापासून बांधली जातात. नवी वास्तू या आधुनिक पद्धतीने म्हणजे काँक्रीट स्टील्टने बांधल्या जातात. इथल्या वास्तूंचे आयुष्य फक्त १५ ते २० वर्षे असते. पाण्यातल्या परिसंस्थेत त्यानंतर या वास्तू सोडल्या जातात. त्या जागी नव्या उभारल्या जातात.