तुम्हीही UPI वापरता? मग ही बातमी शेवटपर्यंत वाचाच

UPI Fraud:- आजच्या डिजिटल युगात UPI हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी दूध, भाजीपाला, रिक्षा भाडे, किराणा, ऑनलाइन खरेदी अशा प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहारासाठी आपण UPI वापरतो. काही सेकंदांत पैसे पाठवता येतात, ही या प्रणालीची सर्वात मोठी सोय आहे.

मात्र हीच जलद प्रक्रिया अनेकदा आपल्यासाठी धोका ठरते. घाई, अर्धवट माहिती आणि जास्त विश्वास या गोष्टींचा फायदा घेऊन सायबर ठग तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा चूक UPI प्रणालीत नसते, तर आपल्या सवयींमध्ये असते. त्यामुळे आता प्रत्येकाने काही सोपे पण ठोस डिजिटल नियम पाळणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

UPI वापरताना काय काळजी घ्याल?

1-UPI ही सुरक्षित प्रणाली असली तरी सायबर गुन्हेगार थेट बँक हॅक करत नाहीत, तर ते तुमच्याशी बोलून, मेसेज पाठवून किंवा कॉल करून फसवणूक करतात. सध्या सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ स्कॅम. समोरची व्यक्ती तुम्हाला “मी पैसे पाठवत आहे” असे सांगते आणि तुमच्या फोनवर एक रिक्वेस्ट येते. अनेक लोक घाईघाईत ती रिक्वेस्ट स्वीकारतात आणि पिन टाकतात. याच क्षणी पैसे येण्याऐवजी तुमच्या खात्यातून पैसे कट होतात. लक्षात ठेवा, पैसे स्वीकारण्यासाठी कधीही UPI पिन टाकावा लागत नाही. पिन फक्त पैसे पाठवताना वापरला जातो. ही एक छोटी चूक तुमचे हजारो किंवा लाखो रुपये घालवू शकते.

2-दुसरा मोठा धोका म्हणजे बनावट QR कोड. काही वेळा फसवणूक करणारे QR कोड पाठवतात किंवा दुकानात लावलेले QR बदलतात. तुम्ही QR स्कॅन केल्यानंतर थेट ‘Pay’ बटण दाबता आणि पैसे चुकीच्या खात्यात जातात. म्हणून QR स्कॅन केल्यानंतर समोर दिसणारे नाव नीट तपासणे खूप महत्त्वाचे आहे. रक्कमही एकदा पुन्हा पाहा. फक्त एक सेकंद जास्त घेतला, तर मोठे नुकसान टाळता येऊ शकते.

3-आज अनेक लोक अडचण आली की गुगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधतात. इथेही मोठा धोका आहे. अनेक वेळा गुगलवर दिसणारे नंबर बनावट असतात. अशा नंबरवर कॉल केल्यास समोरचा व्यक्ती स्वतःला बँक अधिकारी सांगतो आणि तुमच्याकडून OTP, UPI पिन किंवा लिंक क्लिक करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तक्रार करायची असेल तर नेहमी अधिकृत बँक ॲप, बँकेची अधिकृत वेबसाइट किंवा बँकेच्या पासबुकवर दिलेल्या नंबरचा वापर करा.

4-फसवणूक करणारे अनेकदा स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात. AnyDesk, TeamViewer अशा ॲपच्या मदतीने ते तुमच्या फोनचा पूर्ण कंट्रोल घेतात. एकदा हा कंट्रोल गेला की ते तुमच्या नकळत पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे कोणतीही अनोळखी व्यक्ती स्क्रीन शेअरिंग ॲप सांगत असेल, तर त्वरित सावध व्हा आणि फोन कट करा.

5-घराघरांत आता ‘डिजिटल शिस्त’ असणे फार महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही UPI वापरतात, पण त्यांना सायबर फसवणुकीची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे घरात काही सोपे नियम ठरवा. कोणतीही अनोळखी लिंक उघडायची नाही, OTP किंवा UPI पिन कोणालाही सांगायचा नाही आणि संशयास्पद व्यवहार वाटल्यास घरातील जबाबदार व्यक्तीला आधी विचारायचे.

6-सुरक्षिततेसाठी काही सोप्या सवयी अंगीकारा. दैनंदिन खर्चासाठी वेगळे बँक खाते ठेवा आणि त्यात मर्यादित रक्कम ठेवा. मोठी बचत असलेले खाते UPI ला जोडू नका. बँक ॲपमध्ये रोजच्या व्यवहारांची मर्यादा ठरवा. प्रत्येक व्यवहाराचे मेसेज आणि नोटिफिकेशन येत आहेत का, हे तपासा. फोनला आणि UPI ॲपला मजबूत लॉक ठेवा, शक्य असल्यास बायोमेट्रिक वापरा.

7-सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ‘पे’ बटण दाबण्यापूर्वी एक सेकंद थांबा. ठग नेहमी घाई निर्माण करतात. “लवकर करा”, “ऑफर संपते”, “ताबडतोब पेमेंट करा” असे शब्द वापरले जात असतील, तर समजा काहीतरी गडबड आहे. शांतपणे नाव, रक्कम आणि कारण तपासून मगच व्यवहार करा. थोडीशी सावधगिरी आणि योग्य सवयी तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकतात.