1008 शिवमूर्ती, 135 फूट उंच शिखर आणि 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी! भारतातील कोणत्या राज्यात आहे हे अनोखं मंदिर?

Published on -

राजस्थानच्या वाळवंटी मातीवर उभं राहिलेलं एक असामान्य मंदिर, ज्याचा आकार, श्रद्धा आणि वास्तुकला यांचं एक अद्वितीय संगम आहे ओम मंदिर. पाली जिल्ह्यातील जदन आश्रमाच्या परिसरात उभारलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक केंद्र नाही, तर हे भारतीय संस्कृतीचा गौरव, स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आणि भक्तीभावाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर आज हजारो भक्तांसाठी एक अद्वितीय अध्यात्मिक ठिकाण बनलं आहे.

ॐ मंदिराचे वैशिष्ट्य

 

या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ओम हा आकार. संपूर्ण मंदिरच ‘ॐ’ या पवित्र ध्वनीच्या स्वरूपात रचण्यात आलं आहे. एकूण 270 एकरमध्ये पसरलेलं हे भव्य मंदिर पाहिलं की श्रद्धेइतकंच विस्मयही वाटतो. मंदिराच्या उभारणीस तब्बल 28 वर्षांचा कालावधी लागला. या प्रवासाची सुरुवात 1995 मध्ये अभिषेकाने झाली आणि अखेर 19 फेब्रुवारी 2024 रोजी मंदिर भाविकांसाठी पूर्णतः खुले करण्यात आलं.

चार मजली असलेलं हे मंदिर संपूर्णतः लाल दगडांनी उभारण्यात आलं आहे. नागर शैलीतील ही रचना पाहताना प्रत्येक कोपऱ्यावर आणि खांबावर कोरलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती मनाला मोहवून टाकतात. मंदिरात तब्बल 1200 खांब असून, प्रत्येक खांब हा एक कथा सांगतो देव, धर्म आणि परंपरेची. शिवभक्तांसाठी ही जागा म्हणजे जणू काही कैलास पर्वतच.

 

या मंदिराचं आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच वेळी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची व्यवस्था. याशिवाय भगवान शिवाच्या 1008 मूर्ती मंदिर परिसरात स्थापन करण्यात आल्या आहेत. हे सगळं पाहताना भक्तांची श्रद्धा अधिक गहिरी होते. मंदिरात 108 खोल्या असून, या खोल्या ध्यान, साधना आणि भक्तीच्या वातावरणाने भरलेल्या आहेत.

7 महान ऋषींच्या समाधी

मंदिराच्या मध्यभागी गुरु माधवानंदजी यांची समाधी आहे. ही समाधी श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे आणि त्याभोवतीच संपूर्ण मंदिराची उभारणी झालेली आहे. विशेष म्हणजे या मंदिर परिसरात 7 महान ऋषींच्या समाधी देखील आहेत, ज्यामुळे हे ठिकाण केवळ भक्तीचं नव्हे, तर ऋषी-परंपरेचंही स्मरण देतं.

मंदिराचं शिखर सुमारे 135 फूट उंच असून, त्यावर ब्रह्मांडाच्या आकारात कोरलेलं शिवलिंग प्रतिष्ठापित करण्यात आलं आहे. या शिवलिंगाकडे पाहताना प्रत्येक भक्ताच्या मनात एक अवर्णनीय शांतता आणि श्रद्धा जागृत होते.

ओम मंदिर पाहण्यासाठी जाणाऱ्यांसाठी सर्वात जवळचं विमानतळ जोधपूर आहे, जे मंदिरापासून सुमारे 71 किमी अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात जवळचं स्टेशन मारवाड आहे, जे 23 किमी अंतरावर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!