भारतीय सैन्याच्या क्षमतांमध्ये लवकरच एक जबरदस्त वाढ होणार आहे आणि तीही अशी, जी शत्रूच्या मनात भय निर्माण करणारी ठरेल. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO सध्या एका अशा शक्तिशाली शस्त्र प्रणालीवर काम करत आहे, जी केवळ तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत नाही, तर तिचा वेग आणि मारकता दोन्ही लक्षणीय आहे. ही प्रणाली म्हणजे ‘पिनाका IV’ भारतीय बनावटीचे एक गाईडेड रॉकेट लाँचर, जो भविष्यातल्या युद्धासाठी भारताचं ब्रह्मास्त्र ठरू शकतो.

‘पिनाका IV’ रॉकेट लाँचर
पिनाका IV ही प्रणाली केवळ भारतात तयार होत आहे हेच विशेष नाही, तर ती सुमारे 300 किलोमीटर अंतरावर अचूक प्रहार करण्यास सक्षम असेल, ही बाब जगाचं लक्ष वेधून घेणारी आहे. आतापर्यंत भारतीय हवाई दलाच्या काही क्षेपणास्त्रांनाच एवढ्या लांब टप्प्यावर हल्ला करण्याची क्षमता होती, पण आता थेट लष्कराच्या ताफ्यातच अशी प्रचंड शक्तिशाली प्रणाली सामील होणार आहे. यामुळे पाकिस्तानातील सर्व प्रमुख शहरे लाहोरपासून इस्लामाबादपर्यंत या यंत्रणेच्या थेट रेंजमध्ये असतील. हाच एक संकेत आहे की, भारत आता आपल्या सीमांचा बचाव केवळ पारंपरिक पद्धतीने न करता, अत्याधुनिक आणि आक्रमक साधनांनी सज्ज होत आहे.
पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरचं नाव भगवान शिवाच्या पवित्र धनुष्यावरून प्रेरित आहे. त्याच्या नव्या आणि प्रगत आवृत्तीमध्ये फक्त 44 सेकंदांत 12 रॉकेट्स डागण्याची क्षमता आहे. एवढंच नव्हे तर, प्रत्येक रॉकेटचा वेग तब्बल Mach 4.7, म्हणजे सुमारे 5,800 किलोमीटर प्रति तास इतका आहे, जे थांबवणं कोणत्याही संरक्षण प्रणालीसाठी जवळपास अशक्य आहे.
वैशिष्ट्ये
या प्रणालीची आणखी एक खासियत म्हणजे तिची “शूट अँड स्कूट” क्षमता. म्हणजेच, रॉकेटचा वर्षाव केल्यानंतर संपूर्ण लाँचर लगेचच दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो, ज्यामुळे शत्रूला मूळ हल्ल्याचं स्थान शोधणं कठीण होतं. युद्धभूमीवर याचे परिणाम फारच परिणामकारक असतात. शत्रूला प्रत्युत्तर द्यायची संधीच मिळत नाही.
DRDO ने यापूर्वीच पिनाकाच्या विविध आवृत्त्या यशस्वीरित्या चाचणी करून भारतीय सैन्यात समाविष्ट केल्या आहेत. MK-I ची रेंज 40 किलोमीटर, MK-II ची 60 किलोमीटर आणि MK-II ER ची सुमारे 90 किलोमीटर इतकी होती. पण आता पिनाका IV च्या 300 किलोमीटरच्या रेंजमुळे ही प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कार्यक्षमतेचं उदाहरण ठरेल, अशी खात्री आहे.
भारताने 2030 पर्यंत एकूण 22 पिनाका रेजिमेंट्स सैन्यात समाविष्ट करण्याचं लक्ष्य ठेवले आहे. यामुळे सीमारेषेवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल, तर आक्रमक क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढेल.