भारतातील लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. अनेक वर्षांपासून चर्चा आणि प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. हायस्पीड रेल्वेचा अनुभव घेण्यासाठी भारत आता जास्त दूर नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः याबबत सर्व अपडेट दिली आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन
जपान सरकारच्या तांत्रिक मदतीने सुरु झालेला मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारताच्या परिवहन इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. एकूण 508 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर ट्रॅक, स्टेशन आणि सिग्नलिंगची उभारणी जोरात सुरू आहे. या मार्गावर ट्रेन 320 किमी प्रतितास या वेगाने धावणार असून त्यामुळे प्रवासाचा कालावधी केवळ काही तासांमध्ये मर्यादित होणार आहे.
सध्या गुजरातमधील वापी ते साबरमती या दरम्यान बुलेट ट्रेनसाठी कॉरिडॉरचे काम सुरु आहे. याचे बांधकाम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यानची प्रगती पाहता, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता मजबूत झाली आहे. ही कामं पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र ते साबरमती आणि अहमदाबाद ते मुंबई असा दुसरा टप्पाही तयार होईल. या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
2030 पासून पहिली बुलेट ट्रेन धावणार?
याचा थेट अर्थ असा की, भारतात पहिली बुलेट ट्रेन 2030 पासून प्रत्यक्ष धावू शकते. ही तारीख देशाच्या आधुनिकतेकडे वाटचाल करताना एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं की हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा आहे. नागरी संरचना, ट्रॅक बसवणं, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन आणि उच्चगतीच्या ट्रेनसेट्स यांची पुरवठा साखळी आणि नियोजन या सगळ्याचा प्रगतीवर थेट परिणाम होतो.
देशातील पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार असून, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या कामावर पूर्ण क्षमतेने लक्ष केंद्रीत करत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ वेळेची बचत होणार नाही, तर भारताचा रेल्वेवरील विश्वास आणि अभिमानही अधिक गडद होईल.