गुजरातएवढा बर्फाचा तुकडा फुटण्याच्या मार्गावर?, मुंबईसह जगभरातील शहरांना जलप्रलयाचा धोका! वैज्ञानिकांचा खळबळजनक इशारा

Published on -

पश्चिम अंटार्क्टिकाच्या एका कोपऱ्यात, पृथ्वीच्या अत्यंत थंड आणि निर्जन भागात, थ्वेट्स नावाची एक हिमनदी जिचे दुसरे नाव “डूम्सडे ग्लेशियर” (Doomsday Glacier)आहे, ती आज संपूर्ण जगासाठी धोक्याचा इशारा बनली आहे. तिच्या अस्तित्वात सुरू असलेले बदल इतके गंभीर आहेत की जागतिक हवामानशास्त्रज्ञही आता भीतीने थरथर कापायला लागले आहे. कारण, ही हिमनदी जर फुटली, तर जगाचा नकाशा कायमचा बदलू शकतो.

“डूम्सडे ग्लेशियर”

थ्वेट्स ही हिमनदी सुमारे 191,658 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेली आहे, म्हणजेच जवळपास संपूर्ण गुजरात राज्याच्या आकाराची. तिच्या पोटात लाखो वर्षांपासून गोठलेला बर्फ, एकदा का वितळायला लागला की, तो थांबवणे अशक्य होईल. शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत या हिमनदीखाली असलेले ‘लपलेले तलाव’ जास्तच अस्थिर झाले आहेत. उष्ण समुद्री प्रवाहांमुळे या भागातील बर्फ अधिक वेगाने वितळू लागला आहे.

थ्वेट्स ग्लेशियरचं (Thwaites Glacier ) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या काठावर असलेली ‘फ्लोटिंग आइस शेल्फ’ एक प्रकारचा तरंगता बर्फाचा भाग. हा आता इतका कमकुवत झाला आहे की तो कोणत्याही क्षणी फुटू शकतो. त्याचं फुटणं म्हणजे हजारो कोटी टन बर्फ समुद्रात पडण्याची प्रक्रिया सुरू होणे, ज्याचा थेट परिणाम समुद्राच्या पातळीवर होईल.

‘या’ शहरांना धोका

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, फक्त थ्वेट्स ग्लेशियरच वितळला तरीही समुद्राची पातळी तब्बल 65 सेंटीमीटरने वाढू शकते. पण यावरच गोष्ट संपत नाही. जर तिच्या शेजारील हिमनद्या ज्या आधीच तणावात आहेत, त्यासुद्धा याच प्रकारे कोसळल्या तर ही वाढ 10 फूटांपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत लंडन, न्यूयॉर्क, बँकॉक, शांघाय, मियामी, टोकियो आणि मुंबईसारखी मोठी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होतो.

या हिमनदीला ‘डूम्सडे ग्लेशियर’ का म्हणतात, हे नाव ऐकतानाच धस्स होतं. पण या नावामागील तथ्य अजूनही अधिक गंभीर आहे. तिचं अस्तित्व, तिचं संतुलन, आणि तिचा कोसळण्याचा धोका या सगळ्याच गोष्टी आपल्या भविष्यासाठी गंभीर परिणाम घडवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!