भारतातील एक प्राचीन शास्त्र सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीराच्या विविध अंगांच्या रचनेवरून व्यक्तीच्या नशिबाचा अंदाज लावता येतो असं मानलं जातं. विशेषतः दातांच्या स्वरूपावरूनही व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक स्थिती, यश, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान याबाबत संकेत मिळतात, असं म्हणतात.
सामुद्रिक शास्त्र सांगतं की, ज्यांच्या दातांमध्ये थोडंसं अंतर असतं, त्यांना पैशाच्या बाबतीत चांगलं नशिब लाभतं. हे लोक आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात, पण त्याचबरोबर ते थोडे खर्चिकही असतात. पैसा त्यांच्याकडे येतो खरा, पण टिकवणं त्यांना तितकंसं जमत नाही. तरीसुद्धा, त्यांच्या आयुष्यातील सुख-सुविधा आणि आराम यामुळे त्यांचं जीवन भरभराटीचं दिसतं.

पांढरे आणि चमकदार दात
पांढरे आणि चमकदार दात हे तर नेहमीच सौंदर्याचं आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. पण सामुद्रिक शास्त्रात या दातांना एक वेगळं स्थान आहे. असे दात असलेली व्यक्ती केवळ आरोग्यदृष्ट्या नव्हे, तर सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवरही यशस्वी ठरते. तिच्या आयुष्यात सुख, संपत्ती आणि मान-सन्मान यांचा वर्षाव झालेला दिसतो.
नीट दात
सरळ, नीट रचलेले दात हे देखील शुभतेचं लक्षण मानलं जातं. अशा दातांच्या लोकांना जीवनात पैसे कमवायला विशेष कौशल्य असतं. ते बहुतेक वेळा व्यावसायिक असतात आणि नवीन कल्पना घेऊन यशस्वी होतात. त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट आणि योजनाबद्ध असतो.
याशिवाय, समान आणि सुसंगत आकाराचे दात असणारे लोक खूप संतुलित स्वभावाचे असतात. त्यांच्या निर्णय क्षमतेत स्थैर्य असतं. ते कुठल्याही परिस्थितीत घाईगडबड करत नाहीत. त्यांच्या विचारसरणीत एक शांतपणा असतो, ज्यामुळे त्यांना अनेकदा आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक यश लाभतं. त्यांची जीवनातील प्रगती ही धीम्या पण ठाम पावलांनी होते.
दातावर दात असणे
काही लोकांचे दात इतर दातांवर वाढलेले असतात – जे शरीरशास्त्राच्या दृष्टीने विशेष मानले जातं. सामुद्रिक शास्त्र सांगतं की अशा लोकांमध्ये अपार प्रतिभा असते. ते सर्वसामान्यांच्या पलीकडचं काहीतरी करतात. मात्र त्यांचं आयुष्य काहीसं गूढ, थोडंसं खडतरही असतं. त्यांच्या वाट्याला काही आरोग्याच्या अडचणीही येऊ शकतात, पण तरीही नशिब त्यांना कधीच पाठी सोडत नाही.