भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे अनेक प्रथा, परंपरा आणि श्रद्धा वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात. काही परंपरा आपल्या परिचयाच्या असतात, तर काही इतक्या अनोख्या आणि आश्चर्यजनक की त्यांच्यावर सहज विश्वास बसत नाही. छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यात अशीच एक अतिशय अद्भुत परंपरा आजही जपली जाते, जी मृतात्म्यांशी निगडित आहे. इथे लग्नाच्या वेळी केवळ जिवंत नातेवाइकांनाच नव्हे, तर पूर्वजांच्या आत्म्यांनाही औपचारिकपणे आमंत्रित केलं जातं.

काय आहे’आना कुडमा’ परंपरा?
या परंपरेचा भाग म्हणजे ‘आना कुडमा’. आदिवासी समाजात या परंपरेला मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व आहे. ‘आना कुडमा’ म्हणजेच आत्म्यांचं घर. स्थानिक लोकांचा असा ठाम विश्वास आहे की मरणोत्तर आत्मा हा घराच्या आसपासच असतो, पण तो घरात प्रवेश करत नाही जोपर्यंत कुटुंबीय त्याला औपचारिक आमंत्रण देत नाहीत. म्हणूनच कुटुंबात जेव्हा लग्न, पूजा किंवा कोणतंही महत्त्वाचं कार्य होतं, तेव्हा आधी त्या आत्म्यांना आमंत्रण देऊन त्यांच्या उपस्थितीची खात्री केली जाते.
या परंपरेत आत्म्यांसाठी घरात एक खास खोली असते. त्या छोट्याशा खोलीत मातीचं एक भांडं ठेवलेलं असतं, आणि असं मानलं जातं की पूर्वजांची आत्मा त्या भांड्यात वास करते. घरातल्या सदस्यांना त्या आत्म्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या सन्मानार्थ रोज पूजा केली जाते आणि प्रत्येक सण-उत्सवात त्यांना सहभागी मानलं जातं.
विवाह प्रसंगी पाळली जाते विशेष परंपरा
या श्रद्धेचं आणखी एक भावनिक रूप पाहायला मिळतं जेव्हा लग्नाची तयारी सुरू होते. लग्नाच्या मेजवानीसाठी जेव्हा पाहुण्यांना आमंत्रण दिलं जातं, तेव्हा आत्म्यांनाही तितक्याच आदराने आणि विधीपूर्वक बोलावलं जातं. गावकरी सांगतात की या आत्म्यांच्या आशीर्वादाशिवाय विवाह विधी अपूर्ण मानला जातो. वधू-वरांवर प्रेमपूर्वक कृपादृष्टी ठेवावी, यासाठी त्यांना घरातल्या सर्व सोहळ्यांत सामावून घेतलं जातं.
फक्त लग्नच नाही, तर जेव्हा शेतातून नवं पीक घरी येतं, तेव्हाही त्या आत्म्यांना पहिलं अन्न अर्पण केलं जातं. जर हे विसरून गेलं, तर गावावर संकट येऊ शकतं असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे चुकूनही अशी चूक झाली, तर विशेष पूजा करून क्षमा मागितली जाते.
या गावात बहुतांश लोक एकाच गोत्रातले असल्याने, कोणी मरण पावल्यावर त्या गोत्राचे लोक एकत्र येऊन त्या आत्म्याला ‘आना कुडमा’ मध्ये प्रतिष्ठित करतात. मग त्या आत्म्याची देखील नियमित पूजा सुरू होते. मृत व्यक्तींच्या आठवणी फक्त मनातच नाही, तर प्रत्यक्ष पद्धतीने घरातल्या प्रत्येक गोष्टीत जागवण्याची ही अनोखी रीत आजही जिवंत आहे.