भारताच्या संरक्षण क्षमतेमध्ये एक मोठी झेप घेतली गेली आहे. आता भारत अशा स्थितीत पोहोचला आहे की तो केवळ अण्वस्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार नाही, तर अण्वस्त्र साठवणाऱ्या भूमिगत बंकरांनाही धुळीला मिळवू शकतो. हे शक्य झालं आहे भारताच्या नव्या बंकर बस्टर क्षेपणास्त्र प्रकल्पामुळे, ज्यामुळे ब्रह्मोसच्या यशस्वी कारकिर्दीनंतरही एक पाऊल पुढे टाकलं गेलं आहे.

हे सारं सुरू झालं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर, जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या 11 प्रमुख हवाई तळांवर लक्ष्य केले. नूर खानसारख्या अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक एअरबेसवर हल्ला करताना, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा अत्यंत अचूक वापर झाला. पाकिस्तानला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आणि त्यांनी युद्धबंदीची भाषा बोलायला सुरुवात केली. या ऑपरेशननंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, आपल्या शस्त्रास्त्रांच्या अचूकतेवर प्रश्नच नाही. पण मग एक नवीन प्रश्न उभा राहिला.
स्वदेशी बंकर बस्टर क्षेपणास्त्र
तो प्रश्न म्हणजे, जर शत्रूने आपल्या अण्वस्त्र साठ्यांना जमिनीत खोल बंकरमध्ये लपवून ठेवलं, तर आपण त्यावर हल्ला कसा करू? अमेरिकेकडे जसं ‘बंकर बस्टर’ बॉम्ब्सचं प्रगत तंत्रज्ञान आहे, तसंच काहीसं आपल्याकडेही असायला हवं, हे या ऑपरेशनमुळे प्रकर्षाने जाणवू लागलं. आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून भारताने स्वदेशी बंकर बस्टर क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रकल्पात मुख्य भूमिका बजावत आहे ‘अग्नि-5’ हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. यामध्ये आता असे बदल केले जात आहेत की ते केवळ लांब अंतरावर हल्ला करणारे क्षेपणास्त्र राहणार नाही, तर कमी अंतरावर देखील अत्यंत अचूकपणे जमिनीत 100 मीटर खोल असलेल्या बंकरलाही उद्ध्वस्त करू शकेल. म्हणजेच, हे क्षेपणास्त्र आता ‘सर्जिकल स्ट्राइक’सारख्या भूमिकांसाठीदेखील तयार केलं जात आहे.
जिथे अमेरिकेच्या स्टेल्थ बॉम्बर्स आणि बंकर बस्टर बॉम्ब्सवर अब्जावधी डॉलर्स खर्च होतो, तिथे भारत आपलं आधीच असलेलं प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात अधिक परिणामकारक पर्याय विकसित करत आहे.
चीन-पाकिस्तान धास्तावला
या क्षेपणास्त्र प्रकल्पामुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. अण्वस्त्र हत्यारांचा वापर फक्त शाब्दिक धमक्यांपुरता मर्यादित असेल, पण भारत आता स्पष्टपणे दाखवत आहे की जर गरज भासली, तर आपण प्रत्यक्ष कृती करून शत्रूचे बुरुज उध्वस्त करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती दोन्ही ठेवतो.
भारताची ही स्वदेशी पद्धतीने विकसित होणारी बंकर बस्टर प्रणाली केवळ शस्त्र नाही, ती एक भूमिका आहे भारत आता केवळ सहन करणार नाही, तर योग्य वेळी ठोस प्रत्युत्तर देणार, तेही अत्यंत अचूकतेने.