भारतीय नागरिकत्व म्हणजे केवळ देशात जन्म घेणे नव्हे, तर त्या राष्ट्राशी असलेली एक सखोल ओळख आणि जबाबदारीची बांधिलकी. परंतु आज जेव्हा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ओळखपत्रांची इतकी चलती आहे, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो “मग खरंच, माझ्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतं कागदपत्र आहे?” बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमुळे आणि त्यावर झालेल्या न्यायालयीन चर्चेमुळे या प्रश्नाने पुन्हा एकदा महत्त्व मिळवलं आहे.

भारतीय नागरिकत्वसाठी आधार पुरेसा नाही..
आपण दररोज जे आधार कार्ड वापरतो, ते अनेक ठिकाणी ओळख सिद्धसाठी कामी येतं. हॉटेलमध्ये चेक-इन करताना, बँकेत खाते उघडताना, सरकारी सेवा घेताना. पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की आधार हे केवळ एक ओळखपत्र आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्याचप्रमाणे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड असलं, तरीही ते तुमचं भारतीय नागरिकत्व सिद्ध करत नाही. यामुळे अनेकांची गोंधळाची स्थिती अधिकच वाढली आहे.
‘ही’ 3 कागदपत्रे महत्वाची
मग नेमकं काय सिद्ध करतं की तुम्ही भारतीय नागरिक आहात? याचं स्पष्ट उत्तर आहे पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र ही ती प्रमुख कागदपत्रं आहेत जी तुमचं नागरिकत्व साक्ष देऊ शकतात. उदाहरणार्थ, वैध भारतीय पासपोर्ट हे केवळ प्रवासाचं साधन नसून, तुमची भारतीय नागरिक म्हणून झालेली अधिकृत नोंद दर्शवतो. त्याचप्रमाणे, जन्म प्रमाणपत्र, विशेषतः जर ते भारतात अधिकृतरीत्या नोंदवलेलं असेल, तर ते तुमचं जन्माने झालेलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करू शकतं.
मतदानाचा अधिकार तर फक्त भारतीय नागरिकांनाच असतो. त्यामुळे मतदार ओळखपत्र हे देखील नागरिकत्व सिद्ध करणारं एक महत्त्वाचं दस्तऐवज मानलं जातं. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरच हे ओळखपत्र दिलं जातं, त्यामुळे ते लहान मुलांसाठी वापरता येत नाही.
‘भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र’ कुणासाठी आवश्यक?
याशिवाय, ‘भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र’ हे एक वेगळंच दस्तऐवज आहे, आणि ते फक्त त्यांच्यासाठी असतं जे जन्माने भारतीय नाहीत, पण त्यांनी भारतात येऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर भारतीय नागरिकत्व मिळवलं आहे. म्हणजेच, जन्माने भारतीय नागरिक असलेल्या कोणालाही हे प्रमाणपत्र वेगळं घेण्याची गरज नसते.
या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. भारतात नागरिक म्हणून आपली ओळख फक्त आधार किंवा मोबाईल नंबरपुरती मर्यादित नाही. त्या ओळखीच्या मुळाशी, एक मजबूत दस्तऐवज असणं आवश्यक आहे, जे केवळ सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी नाही, तर आपली लोकशाहीतील भूमिका बजावण्यासाठीदेखील अत्यावश्यक आहे.