आजच्या काळात फिट राहण्यासाठी अनेक लोक प्रोटीन पावडरचा आधार घेतात. बाजारात शेकडो ब्रँड्सची भुरळ पडणारी पावडर सहज मिळते, पण यामागचं वास्तव बऱ्याचदा धोकादायक असतं. अनेक वेळा ही पावडर केवळ भेसळयुक्त नसते, तर ती शरीरासाठी दीर्घकाळात अपायकारक ठरू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रथिनांची गरज भागवण्यासाठी पर्यायच नाहीत. निसर्गात असे अनेक नैसर्गिक घटक आहेत जे तुमच्या शरीराला आवश्यक ती ताकद, पोषण आणि ऊर्जा देऊ शकतात तेही कोणत्याही कृत्रिम पावडरशिवाय.
शेंगा आणि डाळी

शेंगा आणि डाळी या आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असलेल्या साध्या घटकांमध्ये प्रथिनांचा खजिना लपलेला आहे. हरभरा, मसूर, मूग, राजमा किंवा लोबिया यांमध्ये केवळ प्रथिनं नाहीत, तर फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजेही भरपूर असतात. एक वाटी शिजवलेल्या डाळीत 18 ग्रॅमपर्यंत प्रथिनं असतात. त्यामुळे रोजच्या जेवणात डाळी अधिक प्रमाणात घेणं ही एक चांगली सवय ठरू शकते.
पनीर
तसेच, शाकाहारी लोकांसाठी पनीर म्हणजे एक वरदानच आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 18 ते 20 ग्रॅम प्रथिनं मिळतात. तुम्ही ते पराठ्यांमध्ये, कोशिंबिरीत किंवा साध्या नाश्त्याला वापरू शकता. यामध्ये भरपूर कॅल्शियमही असतं, जे तुमच्या हाडांसाठी आवश्यक आहे. रोज थोडंसं पनीर खाल्लं, तर ताकद वाढताना तुम्हाला स्वतःलाच जाणवेल.
ड्रायफ्रूटस
काजू, बदाम, अक्रोड, शेंगदाणे किंवा चिया बिया यांचा आहारात समावेश करणे ही अजून एक प्रथिनं मिळवण्याची नैसर्गिक पद्धत आहे. हे पदार्थ केवळ उर्जादायक नाहीत, तर शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करतं ठेवण्यासाठी लागणारी निरोगी चरबीही पुरवतात. थोडंसं सेवन केल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि नेहमी नेहमी भूकही लागत नाही.
ग्रीक दही
प्रथिनांसाठी आणखी एक घरगुती खजिना म्हणजे दही विशेषतः ग्रीक दही. हे दही सामान्य दह्याच्या तुलनेत दुप्पट प्रथिनं पुरवतं आणि पचनसंस्थेलाही मदत करतं. सकाळी नाश्त्याला फळांसोबत खाल्लं, तर दिवसाची सुरुवातच पौष्टिकतेने होते.
अंडी
मांसाहार करणाऱ्यांसाठी अंडी ही एक पूर्ण आणि सोपी प्रथिनं मिळवण्याची पद्धत आहे. एका अंड्यात सुमारे 6 ग्रॅम उच्च दर्जाचं प्रथिनं असतं. उकडून, तळून किंवा अंडा भुर्जी तुम्हाला जसं आवडेल तसं ते खाणं सहज शक्य आहे.